डोंबिवलीचा वैभव हरिहरन देशात दुसरा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्टस् ऑफ इंडिया (आयसीएआय)ने चार्टर्ड अकाउंटन्टस् फायनल परीक्षा (जुना आणि नवा अभ्यासक्रम) आणि फाउंडेशन परीक्षेचा निकाल रविवारी रात्री उशिरा जाहीर केला. ही परीक्षा जानेवारी २०२१ मध्ये आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत डोंबिवलीचा वैभव हरिहरन देशात दुसरा आला.
वैभवला ८०० पैकी ६०१ गुण मिळाले असून पहिल्या क्रमांक मिळवलेल्या रायपूरच्या भ्रमर जैन याला ६११ गुण मिळाले. वैभवचे वडील निवृत्त बँक कर्मचारी तर आई खासगी शाळेमध्ये शिक्षिका असून डोंबिवली पूर्वेतील खंबालपाडा परिसरात हरिहरन कुटुंब राहते. वैभव हा पहिल्यापासूनच शाळेत हुशार होता. हॉली एंजल्स स्कूलमधून सीबीएसई बोर्डात दहावी परीक्षेत त्याला ९९.६० टक्के गुण मिळाले होते. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्याने आर.ए. पोद्दार महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. बारावीला त्याने ९६ टक्के गुण मिळवले तर पदवी परीक्षेत ९० टक्के गुण प्राप्त करत तो मुंबई युनिव्हर्सिटीत पहिला आला होता. महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता वैभव सीएचा अभ्यासही करीत होता.
या परीक्षेला देशभरातून ९ हजार ८६८ विद्यार्थ्यांनी दोन्ही ग्रुपची परीक्षा दिली होती. यापैकी अवघे ६ टक्के म्हणजे ५९२ विद्यार्थीच उत्तीर्ण झाले. तर जुन्या अभ्यासक्रमात दोन्ही ग्रुप घेऊन ३ हजार ११६ दोन्ही ग्रुपची परीक्षा दिली. यापैकी अवघे १.४१ टक्के म्हणजे ४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याचबरोबर फाउंडेशन परीक्षेचा निकालही जाहीर झाला असून या परीक्षेला २७ हजार ८०८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी २४.८९ टक्के म्हणजे ६९२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.