मुंबई: सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी आंदोलन होत आहे. या आंदोलनाचे पडसाद गुरुवारी महाराष्ट्रातही पाहायला मिळाले. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात मोठ्या संख्येने आंदोलकांनी सहभाग घेत केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. देशभरात आंदोलन करताना अनेक ठिकाणी हिंसाचार घडत असतानाच मुंबईत मात्र हे आंदोलन शांततेत पार पडल्याने सर्व स्तरावरुन मुंबई पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे. मात्र या शिस्तपूर्ण मोर्चामध्ये कोणत्याही प्रकारची हिंसाचार न घडता, वादविवाद न होता शांततेत कसा पार पडला हा प्रश्न निर्माण झाला होता.
सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणारा मुंबईतील मोर्चा आझाद मैदानात आयोजित करण्याची मागणी आयोजकांनी केली होती. मात्र या परिसरात मोठ्या प्रमाणात सरकारी कार्यालय असल्यामुळे पोलिसांनी ही मागणी अमान्य करत आझाद मैदानाऐवजी हा मोर्चा ऑगस्ट क्रांती मैदानात करावा अशी विनंती पोलिसांनी केली. यानंतर पोलिसांची विनंती मान्य करत आयोजकांनी ऑगस्ट क्रांती मैदानात मोर्चा काढत विरोध करण्याचे ठरविले. यानंतर पोलिसांकडून देखील एक विशेष योजना आखण्यात आली.
आंदोलनादरम्यान कोणताही हिंसाचार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष काळजी घेतली होती. तसेच आयोजक व पोलीस यांच्यामध्ये वेळोवेळी संवाद साधण्यात येत होता. 2 हजार जवानांची पोलीस फौज तयार करण्यात आली होती. या आंदोलनात समाजकंटक घुसण्याची शक्यात वर्तविण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांची आधीच धरपकड केली. आंदोलन ज्या मार्गावरुन जाणार आहे, त्या मार्गावरील गाड्यांचे आवाज बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसेच सीसीटीव्हीची गाडी मोर्चावर बारकाईने नजर ठेऊन होती. आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडूनही खबरदारी म्हणून दक्षिण मुंबईतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. तसेच पोलिसांनी आयोजकांकडून कोणताही हिंसाचार घडणार नाही याचे लेखी स्वरुपात लिहून घेतल्याने या आंदोलनामध्ये कोणतीही हिंसाचारची घटना घडली नाही.