Join us  

ऑडीला धक्का लागला म्हणून तरुणाला मारहाण; कार चालकाने जमिनीवर आपटत केलं बेशुद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 5:13 PM

घाटकोपरमध्ये ऑडी चालकाने एका कॅब ड्रायव्हरला मारहाण करत जमिनीवीर आपटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Mumbai Crime :मुंबईत ओला कॅब चालकाला जबर मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मारहाणीमध्ये कॅब चालकाच्या मेंदुला दुखापत झाली होती. आलिशान ऑडी गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरुन घाटकोपर येथील एका व्यक्तीने ओला चालकाला जबर मारहाण केली. यावेळी त्याची पत्नीही तिथे उपस्थित होती. ऑडी चालकाने त्याच्या गाडीला मागून धक्का लागला म्हणून कॅब चालकाला सुरुवातीला कानाखाली मारली आणि त्यानंतर उचलून जोरात जमिनीवर आपटले. हा सगळा प्रकार एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

घाटकोपरच्या पार्कसाईट परिसरात १८ ऑगस्ट रोजी हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने ओला ड्रायव्हरला मारहाण केल्याचे दिसत आहे. ऑडी चालक ओला चालक कैमुद्दीन मोईनुद्दीन कुरेशी यांना उचलून जमिनीवर फेकताना दिसत आहे. कुरेशी यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली असून त्यांना गुरुवारी जेजे रुग्णालयातील आयसीयूमधून डिस्चार्ज देण्यात आला. 

या घटनेनंतर पार्कसाइट पोलिसांनी घाटकोपर येथील रहिवासी ऋषभ बिभाष चक्रवर्ती आणि त्याची पत्नी अंतरा घोष यांच्याविरुद्ध २४ वर्षीय ओला ड्रायव्हर कैमुद्दीन मोईनुद्दीन कुरेशीला मारहाण केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ऋषभ चक्रवर्ती ओला ड्रायव्हर कैमुद्दीन मोईनुद्दीन कुरेशीला उचलून जमिनीवर फेकत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

व्हिडिओमध्ये ऋषभ बिभाष चक्रवर्ती ऑडी Q3 कारमधून जात असल्याचे दिसून येते. त्यांच्या मागे  कैमुद्दीन मोईनुद्दीन कुरेशी हा कॅब ड्रायव्हर आहे. चक्रवर्ती अचानक गाडीला ब्रेक लावतो. त्यामुळे कुरेशीही जोरात ब्रेक लावतो. पण तोपर्यंत त्याची गाडी ऑडीच्या मागील बाजूस किंचित स्पर्श करते. मात्र कुरेशी लगेच त्याची गाडी मागे घेतो. त्यानंतर ऋषभ आणि त्याची पत्नी गाडीतून बाहेर पडतात आणि कारच्या मागे जाऊन पाहतात. त्यानंतर ऋषभने कुरेशीकडे धाव घेत त्याला गाडीतून बाहेर काढलं.

त्यानंतर ऋषभने कुरेशीला चापटी मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर कुरेशीला मारहाण करत गाडीच्या मागच्या बाजूला नेऊन त्याला उचलून वेगाने जमिनीवर आपटलं. यामध्ये कुरेशी बेशुद्ध झाला. लोक तिथे पोहोचतात ऋषभ आणि त्याची पत्नी तिथून त्यांच्या कारमधून पळून गेल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. या घटनेच्या १० दिवसांनंतर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. घाटकोपरचे रहिवासी ऋषभ बिभाष चक्रवर्ती आणि त्यांची पत्नी अंतरा घोष अशी त्यांची नावे आहेत. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही मूळचे पश्चिम बंगालचे आहेत.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीस