इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर स्मारकाची उंची वाढवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 03:43 PM2020-01-15T15:43:16+5:302020-01-15T15:44:06+5:30

आजच्या निर्णयामुळे या स्मारकाचा चबुतरा 100 फूट व पुतळा 350 फूट अशी स्मारकाची एकूण उंची जमिनीपासून 450 फूट इतकी होणार आहे.

Cabinet approves raising height of Dr. Ambedkar monument at indu mill | इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर स्मारकाची उंची वाढवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर स्मारकाची उंची वाढवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

googlenewsNext

मुंबई - इंदू मिल येथे प्रस्तावित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामधील पुतळ्याची उंची 100 फुटांनी वाढवण्यात येणार आहे, तसेच या स्मारकासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या पुढील आठ दिवसांत देण्यात येतील. तसेच हे स्मारक पुढील दोन वर्षांत बांधून पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत महत्त्वपूण निर्णय घेण्यात आला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी अधिक माहिती दिली. 

अजित पवार यांनी सांगितले की, ''आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकामधील पुतळ्याची उंची 350 फूट इतकी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी या पुतळ्याची उंची 250 फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. आजच्या निर्णयामुळे या स्मारकाचा चबुतरा 100 फूट व पुतळा 350 फूट अशी स्मारकाची एकूण उंची जमिनीपासून 450 फूट इतकी होणार आहे.''

आज झालेल्या  मंत्रिमंडळ बैठकीत स्मारकाच्या सुधारित संकल्पनेचे सादरीकरण सल्लागार शशी प्रभू यांनी केले. या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुधारित संकल्पानुसार सादर केलेल्या अंदाजित खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा खर्च प्राधिकरणामार्फत करण्यात येणार असून त्याची प्रतिपूर्ती शासन करणार आहे.  हा प्रकल्प तीन वर्षात होणे अपेक्षित आहे. यासाठी 9 फेब्रुवारी 2018 रोजी कार्यादेश देण्यात आले असून सर्व संरचनात्मक आराखड्यांचे 100 टक्के काम पूर्ण होऊन आवश्यक त्या परवानग्या देखील प्राप्त झाल्या आहेत. पुतळ्याची उंची वाढविण्याच्या निर्णयामुळे आवश्यक त्या परवानग्या तात्काळ घेण्यात याव्यात असे देखील मंत्रिमंडळ बैठकीत निर्देश देण्यात आले. 

पुतळ्याची उंची वाढल्यामुळे यासाठी लागणारे ब्राँझचे व लोखंडाचे प्रमाण वाढेल तसेच पुतळ्याच्या पायाची देखील वाढ होईल. या स्मारकामध्ये बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट, संग्रहालय व प्रदर्शन भरविण्याची सोय असेल.  तसेच पादपीठामध्ये 6.0 मीटर रुंदीचे चक्राकार मार्ग असतील.  या स्मारकामध्ये 68 टक्के जागेत खुली हरित जागा असेल. या ठिकाणी 400 लोकांची आसनक्षमता असलेले व्याख्यान वर्ग व कार्यशाळा घेण्याची सोय असलेले ध्यानगृह असेल.  तसेच 1000 लोकांची आसनक्षमता असलेले अत्याधुनिक प्रेक्षागृह असेल.   

Web Title: Cabinet approves raising height of Dr. Ambedkar monument at indu mill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.