लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पुन्हा केल्याने आता कोणाला संधी मिळणार याची चर्चा रंगू लागली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झालाच तर तो छोटेखानी असेल. फारतर दहा जणांना मंत्रिपदाची शपथ दिली जाईल, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
मंत्रिमंडळात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह २० मंत्री आहेत. त्यात भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी १० जण आहेत. सर्व कॅबिनेट मंत्री आहेत. विधानसभेच्या एकूण सदस्यांची संख्या लक्षात घेता आणखी २३ जणांना मंत्रिपद दिले जावू शकते. तीन मंत्रिपदे रिक्त ठेवून विस्तारात २० जणांना संधी दिली जाईल असा तर्क होता. मात्र, आता अशी माहिती समोर येत आहे की भाजपच्या सहा व शिंदे गटाच्या चौघांना सामावून घेतले जाईल. भाजपचे चार जण कॅबिनेट मंत्री तर दोन जण हे राज्यमंत्री असतील. शिंदे गटातील दोन जण कॅबिनेट मंत्री तर दोन जण राज्यमंत्री असतील. अन्य १३ रिक्त मंत्रिपदे ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भरली जावू शकतात.
या विभागांना प्रतिनिधित्व
मुंबईत भाजपचे मंगल प्रभात लोढा हे एकच मंत्री आहेत. मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर कोकणातील आहेत. शिंदे गटाचा मुंबईतील एकही आमदार मंत्री नाही, तसेच विदर्भातील कोणीही मंत्री नाही. याचा विचार करून शिंदे गटातर्फे मुंबई व विदर्भाला संधी दिली जावू शकते. तसेच उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातूनही प्रतिनिधित्व दिले जावू शकते.
मोठ्या विस्ताराला अनुमती नाही
मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजप श्रेष्ठींनी हिरवा कंदील दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी कालच्या भेटीत या दोघांनी याबाबतही चर्चा केली. दोन ते तीन मंत्रिपदे रिक्त ठेवून २० मंत्रिपदे भरावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र,अद्याप मोठ्या विस्ताराला पक्षश्रेष्ठींनी अनुमती दिली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.