लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्षा बंगल्यावर सोमवारी रात्री उशिरा दोन तास विविध विषयांवर चर्चा केली. मंत्रिमंडळ विस्तार, आगामी विधानसभा निवडणूक, लोकसभा निवडणुकीत महायुतीला कोणते मुद्दे अडचणीचे ठरले यावर यावेळी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीबाबत तसेच शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याबाबतच्या रणनीतीबाबतही यावेळी चर्चा झाल्याची माहिती आहे. विधिमंडळाचे अधिवेशन २७ जूनपासून सुरू होत आहे, त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल असे मानले जात आहे. काही मंत्र्यांना भाजप पक्षसंघटनेसाठी बाजूला केले जाईल. नवीन चेहरे दिले जातील, जातीय व विभागीय संतुलन साधले जाईल, असेही म्हटले जात आहे.
५०:२५:२५चा फॉर्म्युला? - राज्य मंत्रिमंडळात सध्या २९ सदस्य आहेत. आणखी १४ जणांना संधी दिली जाऊ शकते. भाजप व शिंदे-अजित पवारांमध्ये ५०:२५:२५ टक्क्यांच्या फॉर्म्युल्यानुसार मंत्रिपदांचे वाटप केले जाऊ शकते.
- विस्ताराला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अद्याप मान्यता दिलेली नाही. शिंदे-फडणवीस-अजित पवारांची लोकसभा निवडणुकीपूर्वी विस्तार करण्याची इच्छा होती. मात्र त्याला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मान्यता दिली नाही, असे म्हटले जाते.