राज्य मंत्रिमंडळ विस्तारात धक्कातंत्र; नवे मित्र जोडण्याची शक्यता, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 07:20 AM2023-07-02T07:20:51+5:302023-07-02T07:21:01+5:30

लोकसभा निवडणूक समोर ठेवून रणनीती

Cabinet expansion of Shinde-Fadnavis government is going to happen soon | राज्य मंत्रिमंडळ विस्तारात धक्कातंत्र; नवे मित्र जोडण्याची शक्यता, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात धक्कातंत्र; नवे मित्र जोडण्याची शक्यता, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

googlenewsNext

- यदु जोशी

मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वारे वाहत असताना, आता या विस्तारात धक्कातंत्राचा अवलंब केला जाईल, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. लोकसभेची निवडणूक २०२४ मध्ये होणार असून, या निवडणुकीच्या दृष्टीने विस्ताराकडे पाहिले जात आहे. त्यामुळे विस्तारामध्ये नवीन मित्र जोडण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न असेल, असे म्हटले जाते.

राज्यातील सरकारला पूर्ण बहुमत आहे. नवीन मित्रपक्षाची भाजपला गरज नाही. मात्र, लोकसभेच्या ४० जागा जिंकायच्या असतील, तर अन्य पक्षांतील काही नेत्यांना आपल्याकडे वळवावे लागेल. या दृष्टीने रणनीती आखली जात आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्याचे प्रतिबिंब उमटेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. या संदर्भात दिल्ली व मुंबईतील भाजपचे वरिष्ठ नेते काही नेत्यांशी चर्चा करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सुरू असलेली धुसफुस आपल्या पथ्यावर पडावी, असा भाजपचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते. त्या दृष्टीने येत्या काही दिवसांत हालचालींना अधिक वेग येईल, असे सूत्रांनी सांगितले. भाजप-शिवसेना युती लोकसभेच्या चाळीस जागा जिंकू शकणार नाही, असे विविध सर्वेक्षणांमधून पुढे आले आहे. अशा वेळी अन्य पक्षांमधील काही महत्त्वाचे नेते गळाला लागले, तर लोकसभेचे उद्दिष्ट साध्य होईल, असा मोठा मतप्रवाह भाजपमध्ये आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा उपयोग त्या दृष्टीने करून घेता येईल काय, यावर पक्षात चिंतन सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

...तर धक्कादायक विस्तार 
राज्य मंत्रिमंडळात आणखी २३ मंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो. सध्या २० मंत्री आहेत. भाजप आणि शिवसेनेला १२ मंत्रिपदे देऊन किमान १० मंत्रिपदे नव्याने सोबत आलेल्यांना देता येतील का, याची चाचपणी केली जात आहे. सध्या या संदर्भात जी बंदद्वार चर्चा सुरू आहे, ती यशस्वी झाली, तर मंत्रिमंडळ विस्तार धक्कादायक राहू शकतो.

भाजप कोअर कमिटीची आज बैठक 
भाजपच्या कोअर कमिटीची बैठक रविवारी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बैठकीत चर्चा होईल. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, तो दौरा मध्येच सोडून  ते मुंबईला रात्री उशिरा परतले. मंत्री गिरीश महाजन त्यांच्यासोबत होते.

Web Title: Cabinet expansion of Shinde-Fadnavis government is going to happen soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.