कॅबिनेट मंत्री 'शिवतीर्थ'वर बैठकीसाठी का?; राज ठाकरेंनी एका वाक्यात दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 11:34 AM2023-10-13T11:34:46+5:302023-10-13T11:35:40+5:30
आज राज्यात तुम्ही थेट कॅबिनेट दर्जाचे मंत्री असताना राज ठाकरेंच्या घरी बैठकीला आला आहात. ज्यांचा केवळ १ आमदार आहे त्यामुळे तुमची भावना काय असा प्रश्न दादा भुसेंना केला
मुंबई – टोलबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्यासह विविध विभागाचे शासकीय अधिकारी हजर होते. राज ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरेंच्या घरी मंत्री आणि शासकीय अधिकारीही दाखल झाले. शिवतीर्थ निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या.
बैठकीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात पत्रकाराने या मुद्द्यावर थेट मंत्री दादा भुसे यांना प्रश्न विचारला. पत्रकाराने म्हटलं की, अलीकडेच साखरेच्या प्रश्नावर केंद्रीय सचिवापासून अनेक अधिकारी शरद पवारांच्या घरी गेले होते, कारण प्रश्न तेवढा मोठा होता. आज राज्यात तुम्ही थेट कॅबिनेट दर्जाचे मंत्री असताना राज ठाकरेंच्या घरी बैठकीला आला आहात. ज्यांचा केवळ १ आमदार आहे त्यामुळे तुमची भावना काय असा प्रश्न दादा भुसेंना केला. मात्र यावर प्रश्नावर मी उत्तर देतो असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारची एक लाईन आहे, ‘शासन आपल्या दारी’ हे म्हटलं. यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला.
त्याचसोबत दादा भुसे यांना मी आधीपासून ओळखतो, सरळ आणि सज्जन माणूस आहे. त्याच्यामुळे टोलबाबत बैठकीत ज्या गोष्टी ठरल्या आहेत त्या होतील मला आशा आहे. मुख्यमंत्री याविषयात कोर्टात गेले होते. कालच्या बैठकीत मला मुख्यमंत्री शिंदेही टोलबाबत कडवट आहेत. त्यामुळे आगामी काळात टोलविषयी अनेक निर्णय घेतलेले दिसेल असंही राज यांनी म्हटलं.
बैठकीत काय निर्णय झाले?
टोलनाक्यांवर ४ मिनिटांहून अधिक वेळ एकही गाडी थांबणार नाही.
मंत्रालयात टोलसंदर्भात प्रश्नांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येईल
वाढीव टोल एक महिन्यात रद्द केला जाणार असल्याचं सरकारचं आश्वासन
पुढील १५ दिवस मनसे आणि सरकार टोलनाक्यावर व्हिडिओग्राफी करणार
फास्ट टॅग चालला नाही तर एकदाच पैसे भरावे लागतील
टोलनाक्यांवर डिजिटल बोर्डाद्वारे प्रत्येक दिवसाची पैसे वसुलीची माहिती दिली जाणार