Join us

'सावित्री-ज्योती' मालिकेसाठी शासनाकडून अर्थसहाय्य मिळावे, कॅबिनेटमंत्र्यांची मागणी

By महेश गलांडे | Published: December 24, 2020 9:25 AM

सोनी मराठीवर प्रक्षेपित होणारी ही मालिका दशमी क्रिएशन्सची निर्मिती आहे. सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता ही मालिका प्रक्षेपित होत असे. 26 डिसेंबरला मालिका संपत आहे

ठळक मुद्देसोनी मराठीवर प्रक्षेपित होणारी ही मालिका दशमी क्रिएशन्सची निर्मिती आहे. सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता ही मालिका प्रक्षेपित होत असे. 26 डिसेंबरला मालिका संपत आहे. यंदाच्या वर्षी 6 जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात झाली होती.

मुंबई - दिवंगत थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत 'सावित्री-ज्योती' ही मालिका काहीच महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या मालिकेत महात्मा जोतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य खूपच चांगल्याप्रकारे दाखवण्यात आले आहे. या मालिकेतील प्रमुख कलाकार ओंकार गोवर्धन आणि अश्विनी कासार यांच्या अभिनयाचे देखील कौतुक केले जात आहे. पण, असे असले तरी केवळ टीआरपी नसल्याने ही मालिका लवकरच बंद होणार आहे. त्यामुळे समाजातील काही मंडळींकडून खंत व्यक्त करण्यात आली. आता, कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ यांनीही ही मालिका सुरू राहावी, अशी भावना व्यक्त केली आहे.

सोनी मराठीवर प्रक्षेपित होणारी ही मालिका दशमी क्रिएशन्सची निर्मिती आहे. सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता ही मालिका प्रक्षेपित होत असे. 26 डिसेंबरला मालिका संपत आहे. यंदाच्या वर्षी 6 जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात झाली होती. कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे बाकी मालिकांप्रमाणेच या मालिकेचं कामकाज स्थगित झालं होतं. मात्र, लॉकडाऊन संपल्यानंतर या मालिकेचं शूटिंग सुरू झालं होतं. ओंकार गोवर्धन महात्मा फुले यांची तर अश्विनी कासार सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारत आहेत. उमेश नामजोशी या मालिकेचे दिग्दर्शक आहेत. मात्र, आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. त्यामुळे, सामाजिक कार्यकर्त्यांकडून खंत व्यक्त होत आहे. याची दखल घेत कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ यांनी या मालिकेसाठी अर्थसहाय्य मिळावे, अशी मागणी केलीय. 

महापुरुषांचा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहचण्यासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सोनी मराठी वाहिनीवरील ‘सावित्रीजोती’ मालिकेला शासनामार्फत अर्थसहाय्य मिळावे, अशी मागणी अन्न,नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवरु यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. 

महेश टिळेकरांनीही व्यक्त केली खंत 

महेश टिळेकर यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, ’सावित्री ज्योती’ ही महात्मा जोतिबा आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मराठी मालिका केवळ मालिकेला टीआरपी नाही म्हणून बंद होत आहे हे ऐकून नक्कीच मला दुःख झाले. ओंकार गोवर्धन या अभिनेत्याने साकारलेली ज्योतिबा फुले यांची भूमिका आणि तितक्यात ताकदीने सावित्रीबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी कासार यांच्या अभिनयाचे कौतुक करावं तितकं कमीच आहे. पण मग चांगलं कथानक असूनही आपल्या महापुरुषांच्या जीवनावर,कार्यावर आधारित मालिका पाहायला प्रेक्षकांना उत्साह का नसावा? नवऱ्याची लफडी, सासू सूनांची भांडणं, येता जाता एकमेकींवर कुरघोडी करणाऱ्या जावा, हे असं सगळं बटबटीत पाहायचीच प्रेक्षकांना, विशेषतः महिला प्रेक्षकांना आवड असते का असा प्रश्न आता उभा राहिला आहे. 

टॅग्स :सावित्रीबाई फुलेछगन भुजबळअमित देशमुख