कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:13 AM2021-01-13T04:13:57+5:302021-01-13T04:13:57+5:30
जवळच्या नातेवाईक तरुणीने घेतली पोलिसांत धाव, तरुणी म्हणे जीवाला धोका... जवळच्या नातेवाईक तरुणीची पोलिसांत धाव : जिवाला धोका असल्याची ...
जवळच्या नातेवाईक तरुणीने घेतली पोलिसांत धाव, तरुणी म्हणे जीवाला धोका...
जवळच्या नातेवाईक तरुणीची पोलिसांत धाव : जिवाला धोका असल्याची व्यक्त केली भीती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला. या संदर्भात मुंबई पोलीस आणि आयुक्त परमबीर सिंह यांना तिने ट्विट केले. त्याची दखल घेत, सोमवारी (दि. ११) रात्री ओशिवरा पोलिसांनी तरुणीचा तक्रार अर्ज स्वीकारून अधिक तपास सुरू केला आहे.
तक्रारदार तरुणी ही पार्श्वगायिका असून मुंडे यांची जवळची नातेवाईक आहे. तिच्या तक्रारीनुसार, २००६ मध्ये घरात एकटी असताना त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. पुढे दर दोन ते तीन दिवसांनी तिच्यावर अत्याचार सुरू होते. याचे व्हिडीओही त्यांनी काढले. त्यानंतर वारंवार फोन करून प्रेमाची गळ घालण्यास सुरुवात केली. पुढे गायिका होण्यासाठी बड्या सेलिब्रिटी, चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्यांसोबत भेट घालून बॉलिवूडमध्ये संधी मिळवून देण्याचे स्वप्न दाखवत अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तिने १० जानेवारी रोजी याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांंना ऑनलाईन तक्रार दिली. मुंबई पोलीस आणि आयुक्तांंना ट्विट केले. तिच्या ट्विटमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ ट्विटची दखल घेत, जवळच्या पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यास सांगितले. सोमवारी रात्री ११ वाजता तरुणीचा तक्रार अर्ज पोलिसांनी स्वीकारला. तिचा तक्रार अर्ज स्वीकारल्याच्या वृत्ताला ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी दुजोरा दिला.
तरुणी म्हणते जीवाला धोका...
तरुणीने जीवाला धोका असल्याचे सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हे ट्विट टॅग करून मदत मागितली आहे.
....................