मंत्रिमंडळ विस्तारात 'या' मंत्र्यांना मिळेल डच्चू तर एकनाथ खडसेंचं काय होणार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 07:12 AM2018-10-06T07:12:34+5:302018-10-06T07:13:31+5:30
मंत्रिमंडळ विस्तार: गिरकर, शेलार यांची वर्णी लागण्याची शक्यता
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या फेरबदलात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, विद्या ठाकूर यांना डच्चू दिला जाऊ शकतो. विधान परिषदेचे सदस्य भाई गिरकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी सांगितले की, एक वर्षासाठी मंत्रीपद घेण्यास शेलार फारसे इच्छुक नाहीत. त्यांची नजर भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या बरोबरीने भाजपाला यश मिळाले तेव्हाही ते प्रदेशाध्यक्ष होते. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोेले यांच्या जागी मुंबईतील भाजपाचे ज्येष्ठ नेते भाई गिरकर यांना संधी दिली जाऊ शकते. राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्याऐवजी अमरावती जिल्ह्यातील डॉ.अनिल बोंडे यांना मंत्रिपद दिले जाईल. तर विद्या ठाकूर यांना वगळून योगेश सागर यांना मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते.
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनाही डच्चू मिळेल अशी चर्चा आहे. वर्षभरापूर्वी त्यांच्यावर घोटाळ्यांचे गंभीर आरोप झाले तेव्हाच मंत्रिमंडळात फेरबदल झाले असते तर त्यांची गच्छंती अटळ होती. आता आरोपांचा धुराळा खाली बसलेला असताना मेहता हे दिल्लीतील एका वजनदार भाजपा नेत्यांच्या माध्यमातून स्वत:चे मंत्रीपद वाचविण्याचा जोरदार हालचाली करतील, असे म्हटले जाते.
खडसेंबाबत हिरवा झेंडा नाही
ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांना परत मंत्री केले जाईल का या बाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यांच्या समावेशाला भाजपा श्रेष्ठींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अद्याप हिरवा झेंडा दाखविलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले. खुद्द मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे आणि वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा खडसेंना पुन्हा मंत्री करण्याचा आग्रह आहे. मात्र, खडसेंबाबत दिल्लीची नकारघंटा होकारात बदललेली नाही. डच्चूच्या संभाव्य यादीत असलेले आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा हे भाजपाचे जुने निष्ठावंत म्हणून मंत्रीपद वाचवतील असे मानले जाते. त्याचवेळी सावरा यांच्याऐवजी थेट कॅबिनेट मंत्रिपद द्यावे, असा चेहरा भाजपाकडे नाही ही बाब सावरा यांच्या पथ्यावर पडू शकते.
दानवे यांना हवे आहेत लोणीकर
निष्क्रियतेचा ठप्पा असलेले पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांना वगळू नये, असा आग्रह प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी धरला आहे.
जालन्यातील स्थानिक राजकारणाचा विचार करता लोणीकरांची नाराजी दानवेंना ओढावून घ्यायची नसल्याने ते इच्छा नसूनही लोणीकर यांची पाठराखण करीत असल्याचे म्हटले जाते.