Join us

मराठा आरक्षण सुनावणीच्या तयारीचा मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 4:49 AM

शनिवारी सकाळी ११.३० वाजता झालेल्या या बैठकीत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, सदस्य एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, मराठा आरक्षणाची बाजू मांडणारे वरिष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी, परमजितसिंग पटवालिया, विजयसिंह थोरात, अनिल साखरे सहभागी झाले होते.

मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी राज्य सरकारने गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची शनिवारी वरिष्ठ विधिज्ञांसमवेत बैठक झाली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत ७ जुलैला सर्वोच्च न्यायालयात नियोजित असलेल्या सुनावणीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. मंगळवारी न्या. नागेश्वर राव यांच्या खंडपीठात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील याचिका सुनावणीसाठी येणार असून, मराठा आरक्षणाच्या मूळ याचिकेवरही विचार होण्याची शक्यता आहे. या दोन्ही सुनावणीच्या अनुषंगाने विस्तृत चर्चा झाली. शनिवारी सकाळी ११.३० वाजता झालेल्या या बैठकीत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, सदस्य एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, मराठा आरक्षणाची बाजू मांडणारे वरिष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी, परमजितसिंग पटवालिया, विजयसिंह थोरात, अनिल साखरे सहभागी झाले होते. मराठा आरक्षणाचे विधेयक महाराष्ट्र विधिमंडळात एकमताने मंजूर झाले आहे. याबाबत राज्य सरकार न्यायालयात भक्कमपणे आपली बाजू मांडेल, असे उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर सांगितले. आजच्या बैठकीला विधी व न्याय विभागाचे सचिव राजेंद्र भागवत, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी जोंधळे, विधी विभागाचे सहसचिव भुपेंद्र गुरव, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव टिकाराम करपते, रसिक खडसे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या सीईटी सेलचे डॉ. व्यास आदींसह वकील अक्षय शिंदे, वैभव सुखदेवे, राहुल चिटणीस, सचिन पाटील उपस्थित होते. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार व छत्रपती संभाजी राजे यांच्याशी माझी दूरध्वनीवर चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत राज्य शासनाच्या तयारीची मी त्यांनाही माहिती दिली. - अशोक चव्हाण,अध्यक्ष, मराठा आरक्षण उपसमिती

टॅग्स :मराठा आरक्षणअशोक चव्हाणमहाराष्ट्र सरकार