लोअर परळची कोंडी अखेर फुटणार, महालक्ष्मी येथे केबल ब्रिज, डॉ. ई. मोझेस रोडवर उड्डाणपूल उभारणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 04:24 AM2020-01-21T04:24:11+5:302020-01-21T04:24:42+5:30
धोकादायक ठरल्यानंतर गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या लोअर परळ येथील डिलाईल रोड पुलाच्या पुनर्बांधणीला अखेर मुहूर्त मिळाला आहे.
मुंबई : धोकादायक ठरल्यानंतर गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या लोअर परळ येथील डिलाईल रोड पुलाच्या पुनर्बांधणीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार असून यासाठी १३८.४२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसेच महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ डॉ. ई. मोझेस रोडवर उड्डाणपूल आणि केशवराव खाड्ये मार्गावर केबल ब्रिज बांधण्यात येणार आहे. यामुळे या परिसरातील वाहतूककोंडी फुटणार आहे.
अंधेरीत २०१८ मध्ये गोखले पूल कोसळून दोन लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर लोअर परळ येथील धोकादायक ठरलेला डिलाईल रोड पूल वाहतुकीसाठी तत्काळ बंद करण्यात आला. मात्र महापालिका आणि रेल्वेच्या वादात या पुलाचे काम काही सुरू होऊ शकले नाही. परिणामी, महालक्ष्मी, वरळी, लोअर परळ परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. अखेर रेल्वे प्रशासन आणि महापालिकेतील वाद मिटला आहे. त्यानुसार डिलाईल रोड पुलाच्या दुरुस्तीला सुरुवात होणार आहे.
तसेच महालक्ष्मी येथे होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी विकास नियोजन आराखड्यानुसार दोन नवीन पूल बांधण्यात येणार आहेत. या पुलांमुळे कोस्टल रोडचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीचे नियमन सुरळीत होईल. डॉ. ई. मोझेस मार्ग आणि केशवराव खाड्ये मार्गावर बांधण्यात येणाऱ्या या पुलांसाठी मे. स्पेक्ट्रम टेक्नो कन्सलटंट प्रा. लि. यांची तांत्रिक सल्लागार तर आयआयटी, मुंबईची नियुक्ती फेरतपासणीसाठी करण्यात आली होती.
नोव्हेंबर २०२० पर्यंत काम पूर्ण
पश्चिम रेल्वेमार्फत डिलाईल पुलाचे बांधकाम सुरू आहे. पुलासाठी लागणाºया १२५ कोटींपैकी २५.१६ कोटी पालिकेने रेल्वेला दिले आहेत. नोव्हेंबर २०२० पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.
ना. म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावरील डिलाईल पूल (लोअर परळ) येथील जुने जोडरस्ते तोडून नव्याने बांधण्यात येणार आहेत. या कामासाठी १३८.४२ कोटी खर्च होणार आहे. मे. जीएचव्ही (इंडिया) प्रा. लि. कंपनी हे काम करणार आहे. पावसाळा सोडून १८ महिन्यांत हे काम पूर्ण केले जाणार आहे.
महालक्ष्मी स्थानकाजवळील पुलाचे मे. अॅप्को सीआरएफजी या कंपनीचे ६५ टक्के भागीदार असलेली मे. अॅप्को इन्फ्राटेक प्रा. लि. व दुसरी भागीदार संस्था मे. सीआरएफजी संस्था पीपल्स रिपब्लिक आॅफ चायना संस्था करणार आहे. हे काम पावसाळा वगळून तीन वर्षांत होणार आहे.
दक्षिणेकडील केशवराव खाड्ये मार्गावरील पूल हा न्यू शेरीन थिएटरपासून हाजीअलीकडे जाणाºया रोडपर्यंत होणार आहे. ८०३ मीटर लांबीचा हा पूल केबलचा असेल. तर उत्तरेकडे ई. मोझेस रोड ते वरळीकडून धोबी घाट मार्गावर हा उड्डाणपूल ६३९ मीटर असेल. यासाठी ७४५.६९ कोटी खर्च केला जाणार आहे.