केबल व्यावसायिकांना एक महिन्याची मुदतवाढ, ट्रायची उच्च न्यायालयात माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 06:52 AM2018-12-29T06:52:15+5:302018-12-29T06:53:55+5:30
मुंबई : २९ डिसेंबरपासून लागू होणाऱ्या निर्णयाला एक महिन्याची मुदतवाढ देण्यासंदर्भात ट्रायने परिपत्रक काढल्याची माहिती केबल व्यावसायिकांनी उच्च न्यायालयाला ...
मुंबई : २९ डिसेंबरपासून लागू होणाऱ्या निर्णयाला एक महिन्याची मुदतवाढ देण्यासंदर्भात ट्रायने परिपत्रक काढल्याची माहिती केबल व्यावसायिकांनी उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली. त्यामुळे उच्च न्यायालयाने केबल व्यावसायिकांच्या याचिकांवरील सुनावणी ९ जानेवारीपर्यंत तहकूब केली.
ट्रायने काढलेल्या परिपत्रकानुसार, ३१ जानेवारीपर्यंत केबल चालक आता आहे तसे वाहिन्यांचे पॅकेज विकू शकतात आणि मायग्रेशनची प्रक्रियाही सुरू करू शकतात. मात्र १ फेब्रुवारीपासून ट्रायच्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल.
देशभरात ट्रायने २९ डिसेंबरपासून केबल टीव्ही आणि डीटीएच ग्राहकांना वाहिन्या निवडीचे स्वातंत्र्य दिले. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने ट्रायने मुंबईतील केबल व्यावसायिकांबरोबर बैठकही घेतली. मात्र, आपल्या म्हणण्यावर निर्णय घेण्यात आला नाही, असे केबल व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
ट्रायच्या निर्णयावर इतक्या लगेच अंमलबजावणी करणे शक्य नाही. या प्रक्रियेसाठी आणखी वेळ हवा, यासाठी केबल व्यावसायिकांनी उच्च न्यायालयाच्या सुटीकालीन खंडपीठात धाव घेतली होती.
सुनावणी ९ जानेवारीला
ट्रायच्या निर्णयावर इतक्या लगेच अंमलबजावणी करणे शक्य नाही. या प्रक्रियेसाठी आणखी वेळ हवा, अशी मागणी याचिकेद्वारे केबल व्यावसायिकांनी केली.
बुधवारच्या सुनावणी न्या. भारती डांगरे यांनी ट्रायला केबल व्यावसायिकांसह अन्य भागधारकांसोबत बैठक घेऊन योग्य निर्णय घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ट्रायने गुरुवारी केबल व्यावसायिकांसह अन्य भागधारकांबरोबर बैठक घेतली.
मायग्रेशन करण्यासाठी केबल व्यावसायिकांना एका महिन्याची वाढ देण्यासंदर्भात परिपत्रक काढण्यात आल्याची माहिती न्यायालयाला शुक्रवारी देण्यात आली. त्यावर न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी
९ जानेवारी रोजी ठेवली.