मुंबई : मनोरंजन कर भरण्यासाठी अधिकाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या दबावाच्या निषेधार्थ उपनगरातील केबल आॅपरेटर्सनी सोमवारी वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या वेळी आॅपरेटर्सनी अपर जिल्हा अधिकारी कुमार खैरे यांची भेट घेत त्यासाठी मुदतवाढीची मागणी केली. मुंबई उपनगरात सध्या स्थित दोन हजार केबल आॅपरेटर असून, यातील चारशे ते पाचशे केबल आॅपरेटर्सने अद्यापही अनेक महिन्यांचा मनोरंजन कर शासनाकडे जमा केलेला नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसांत सर्व थकबाकी आॅपरेटरांनी शासनाकडे जमा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने आॅपरेटरांना दिल्या आहेत. कर जमा न करणाऱ्या केबल आॅपरेटरांचे कनेक्शन तत्काळ बंद करण्याचे आदेशदेखील जिल्हाधिकारी कार्यालयाने केबल कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे काही कंपन्यांनी आॅपरेटरांचे कनेक्शन बंद केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून झालेल्या या कारवाईमुळे केबल आॅपरेटरांनी सोमवारी वांद्रे जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी या आॅपरेटरांनी अपर जिल्हा अधिकारी कुमार खैरे यांची भेट घेत आॅपरेटरांना असलेल्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. केबल कंपन्यांनी वाढवलेल्या ‘पॅकेज रेट’मुळे कामागारांचा पगार निघणेही कठीण झाले असून, व्यवसायातील चढाओढीमुळे केबलचे भाडे अनेक वर्षांपासून स्थिर असल्याने हा व्यवसाय तोट्यात असल्याचे गाऱ्हाणे घातले. त्यामुळे यासाठी काही मुदत मिळावी, अशी मागणी आॅपरेटरांनी केली आहे. याबाबत विचार करण्याचे आश्वासन देऊन खैरे म्हणाले की, आॅपरेटरांनी त्यांच्या ग्राहकाला आणि त्यांनादेखील काहीही त्रास होऊ नये, यासाठी शासनाने ठरवून दिलेली मनोरंजन कराची रक्कम लवकर शासनाकडे जमा करावी.’ (प्रतिनिधी)
जिल्हाधिकारी कार्यालयावर केबल आॅपरेटरांचा मोर्चा
By admin | Published: March 21, 2017 2:30 AM