महापालिकेत सेनेची ताकद वाढणार, नगरसेवकपद रद्द झाल्याचा फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 01:31 AM2019-04-04T01:31:32+5:302019-04-04T01:32:04+5:30
नगरसेवकपद रद्द झाल्याचा फायदा
मुंबई : मनसेतील सहा नगरसेवकांच्या प्रवेशामुळे सुरक्षित झालेल्या शिवसेनेची ताकद आणखी वाढण्याची शक्यता आहे. भाजपच्या दोन व काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच त्यांचे नगरसेवकपद रद्द केले आहे. त्यामुळे दोन प्रभागांत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेच्या उमेदवाराला त्याचा फायदा होणार आहे.
महापालिका निवडणूक २०१७ मध्ये ८४ नगरसेवक निवडून आल्यामुळे सर्वाधिक संख्याबळ असलेला शिवसेना मोठा पक्ष ठरला. तर ८२ सदस्य संख्या असलेला भाजप दुसरा मोठा पक्ष असल्याने उभय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होती. परंतु मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे व अपक्षांचे समर्थन मिळवून शिवसेनेचे संख्याबळ ९३ वर पोहोचले. त्यात लोकसभा निवडणुकीत भाजपबरोबर युती झाल्यामुळे शिवसेनेची सत्ता सुरक्षित झाली आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयामुळे शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे. जात पडताळणी समितीने भाजपच्या दोन आणि काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविले होते. या नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयानेही त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरविल्यामुळे प्रभाग क्र. २८ मधील काँग्रेसच्या राजपती यादव, प्रभाग क्र. ७६ मधून भाजपच्या केशरबेन पटेल आणि प्रभाग क्र. ८१ मधील मुरजी पटेल यांचे नगरसेवक पद रद्द होणार आहे.
निवडून आल्यानंतर नगरसेवकांना एका वर्षात जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. मात्र जात पडताळणी समितीच्या निर्णयामुळे संबंधित नगरसेवकांचे पद धोक्यात आले होते. याविरोधात संबंधितांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु भाजपच्या केशरबेन पटेल, मुरजी पटेल आणि काँग्रेस नगरसेवक राजपती यादव या तीन नगरसेवकांच्या याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या.
दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांना संधी
न्यायालयाच्या निर्णयानंतर पालिकेच्या महासभेत महापौर संबंधित नगरसेवकांची पदे रद्द झाल्याचे जाहीर करतील. यापूर्वी अंधेरी येथील अपक्ष उमेदवार चंगेझ मुल्तानी यांचे नगरसेवक पद रद्द झाल्यानंतर दुसºया क्रमांकावर असलेले शिवसेनेचे राजू पेडणेकर यांनी न्यायालयात दाद मागून नगरसेवक पद मिळविले. तसेच शिवसेनेचे सगुण नाईक यांचे पद रद्द होऊन तेथे दुसरे उमेदवार रफी शेख यांना नगरसेवकपद मिळाले. त्याप्रमाणे येथेही दुसºया क्रमांकाच्या उमेदवारांना संधी मिळू शकते.
पक्षीय बलाबल
शिवसेना ९३
भाजप ८५
काँग्रेस ३०
राष्ट्रवादी ९
समाजवादी ६
एमआयएम २
मनसे १
एमआयएम २