लसीकरणानंतर काेराेना झाला तरी त्याची तीव्रता खूपच कमी; मृत्यूचे प्रमाणही नगण्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:05 AM2021-04-25T04:05:37+5:302021-04-25T04:05:37+5:30
मुंबईकरांनो, घाबरू नका; काेराेना प्रतिबंधासाठी लस हाच उपाय लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईतील सध्याची दैनंदिन काेराेना लसीकरण क्षमता ...
मुंबईकरांनो, घाबरू नका; काेराेना प्रतिबंधासाठी लस हाच उपाय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील सध्याची दैनंदिन काेराेना लसीकरण क्षमता सुमारे ४५ हजार इतकी असून, ती दररोज १ लाखावर नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आणखी खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी द्यावी, म्हणून काम सुरू आहे. लसीकरणानंतर काेराेना झाला तरी त्याची तीव्रता खूप कमी असून, मृत्यूचे प्रमाणही कमी असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईकरांनाे, घाबरू नका, काेराेना प्रतिबंधासाठी लस हाच उपाय असून, लसीकरण करून घ्या, असे आवाहन प्रशासनाकडूून करण्यात येत आहे.
मुंबई पालिका क्षेत्रात चाचण्यांची संख्या लवकरच ६० हजार प्रतिदिन होणार असून, त्यामध्ये सध्याच्या प्रमाणानुसार बाधितांची संख्या वाढू शकते. दरम्यान, काही व्यक्ती परस्पर वैद्यकीय प्रयोगशाळांकडून चाचणीचा अहवाल मिळवून खासगी रुग्णालयांमध्ये बेड मिळवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी बेडच्या व्यवस्थापनाची साखळी तुटते. त्यामुळे प्रशासनाने कोणत्याही परिस्थितीत वॉर्ड वॉररूमच्या माध्यमातूनच सरकारी तसेच खासगी रुग्णालयांत बेड उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लक्षणे आढळत असलेल्या तसेच सहव्याधी असलेल्या गरजू रुग्णांना मागणीनुसार बेड्स उपलब्ध करून दिले जात आहेत.
- इक्बालसिंह चहल म्हणाले; संसर्ग रोखण्यासाठी लस महत्त्वाची
काेराेना संसर्ग रोखण्यासाठी लस महत्त्वाची आहे. सर्व पात्र नागरिकांनी लस टोचून घ्यावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केले. काेराेना उपचारांसाठी बेडची कमतरता नाही. आयसीयू बेड तसेच व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. आवश्यकतेनुसार बेड्स वाढविण्याची कार्यवाही सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
--------------
लसीकरणानंतर मृत्यूचे प्रमाण नगण्य
लसीकरणासाठी नागरिक येत आहेत. लसींचा साठा काहीसा कमी आहे. लस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शनिवारी आपण महापालिकेच्या केंद्रालाच लस दिली आहे. खासगी केंद्र बंद आहेत. त्यामुळे लसीकरणास गर्दी होत आहे. आपल्याला लसींचा साठा मिळणार आहे. लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. लसीकरणानंतर काेराेना झालाही असेल. त्याला इन्फेक्शन झाले असेल. लसीकरण केले की काेराेना होत नाही, असे नाही, ताे होऊ शकतो; पण त्याची तीव्रता खूपच कमी असते. मृत्यूचे प्रमाणही नगण्य असेल.
- डॉ. मंगला गोमारे,
कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका
- लसीकरणाचा १० लाखांचा टप्पा पार
२६ मार्च रोजी लसीकरणाच्या संख्येचा १० लाखांचा टप्पा पार झाला. तेव्हा एकूण १० लाख ८ हजार ३२३ इतके लसीकरण करण्यात आले. यापैकी ७ लाख ७ हजार ४७४ इतके म्हणजेच ७०.१६ टक्के लसीकरण हे महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांवर करण्यात आले.
* येथे मोफत लसीकरण
महानगरपालिका, राज्य शासन व केंद्र शासन यांच्या अखत्यारितील लसीकरण केंद्रांवर मोफत लसीकरण करण्यात येत आहे, तर खासगी लसीकरण केंद्रांवर शुल्क आकारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सर्वाधिक लसीकरण महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांवर होत आहे.
* नोंदणी केली नसेल तर...
कोविन ॲपवर लसीकरणासाठी यशस्वी नोंदणी केलेल्या नागरिकांनी लसीकरणाच्या दिनांकाची वाट न पाहता, नजीकच्या रुग्णालयांमध्ये थेट जाऊन लस घ्यावी. नोंदणी केली नसल्यास नजीकच्या रुग्णालयात जाऊन नोंदणी करावी व तेथे लस घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले.
* दोन्ही लसी परिणामकारक
१६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीची कोविशिल्ड लस उपलब्ध करून देण्यात आली, तर १५ मार्चपासून भारत बायोटेक या कंपनीची कोव्हॅक्सिन ही लस वापरण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली. दोन्ही प्रकारच्या लसी मुंबईसह देशात वापरण्यात येत आहेत. लस निवडण्याचा पर्याय उपलब्ध नसून, दोन्हीही परिणामकारक आहेत. त्यामुळे लसींबाबत संभ्रम न बाळगता केंद्रावर जी लस उपलब्ध असेल ती घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
-कोणाला कधी लस?
- १६ जानेवारीपासून पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीचे लसीकरण सुरू
- १ फेब्रुवारीपासून फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणास सुरुवात
- १ मार्चपासून वयाची ६० वर्षे पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक, वयाची ४५ वर्षे पूर्ण होण्यासह सहव्याधी असलेले नागरिक यांच्या लसीकरणास प्रारंभ
- १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांनाच मिळणार लस
* एकूण लसीकरण
- पहिला डोस
कोविशिल्ड - १७ लाख २७ हजार ४८६
कोव्हॅक्सिन - १ लाख ११ हजार १०७
- दुसरा डोस
कोविशिल्ड - ३ लाख ९ हजार ७९७
कोव्हॅक्सिन - २७ हजार ९८५
- एकूण
कोविशिल्ड - २० लाख ३७ हजार २८३
कोव्हॅक्सिन - १३ लाख ९ हजार ९२
----------------------------------