मुंबई : मुंबई महापालिकेच्या कोरोना सेंटर, रस्ते बांधणी तसेच जमीन खरेदी अशा १२ हजार कोटींच्या ७६ कामांत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपानंतर ‘कॅग’च्या पथकाकडून पालिकेच्या विविध विभागांची चौकशी सुरू आहे. पालिकेचा पसारा पाहता ‘कॅग’च्या ५ पथकांमार्फत कागदपत्रांची छाननी होत असून गरज पडल्यास मागील दोन वर्षांच्या काळातील सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबई पालिकेच्या विकासकामांमध्ये विशेषतः कोरोना काळातील खर्च, रस्त्याची कामे, पुलाची कामे, मलनि:सारण प्रक्रिया केंद्र, सांडपाणी प्रकल्पांसाठी झालेल्या खर्चात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने केला होता. ही कामे सत्ताधारी शिवसेनेने मर्जीतील कंत्राटदारांना दिल्याचा दावाही करण्यात आला. विधिमंडळ अधिवेशनात त्यावरून रणकंदन झाले होते. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेच्या व्यवहाराची चौकशी ‘कॅग’मार्फत करण्याची घोषणा केली. त्यानंतर प्रथमच मंगळवारी ‘कॅग’चे पथक पालिका मुख्यालयात आले. त्यांनी एक बैठक घेतली. त्यावेळी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व सहाय्यक आयुक्त व प्रत्येक विभागांचे प्रमुख उपस्थित होते. कॅगला ऑडिट करायचे असून पालिका प्रशासन योग्य ते सहकार्य करत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
१० खात्यांतील व्यवहार रडारवर- पालिका प्रशासनासोबत बैठक आयोजित कोरोना काळात निविदा प्रक्रिया न राबवता कोट्यवधी रुपयांची कंत्राटे देण्यात आली. - पालिकेच्या १० खात्यांमधून झालेले व्यवहार कॅगच्या रडारवर आहेत. २८ नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२२ दरम्यानच्या व्यवहारांचे ऑडिट केले जाईल.