Join us

भटक्या कुत्र्यांची होणार गणना

By admin | Published: August 01, 2014 3:09 AM

भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा ठपका आरोग्य विभागावर ठेवला असतानाच आता याच विभागाने त्यांची गणना करण्याचा निश्चय केला आहे.

अजित मांडके, ठाणेभटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा ठपका आरोग्य विभागावर ठेवला असतानाच आता याच विभागाने त्यांची गणना करण्याचा निश्चय केला आहे. यासाठी ८ ते १० लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. कुत्र्यांच्या शस्त्रक्रियेसाठी केंद्र शासनाच्या अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डाकडून अनुदान मिळावे, यासाठी त्यांची गणना करण्याचे पालिकेने निश्चित केले आहे. परंतु, दुचाकीवरून ही गणना केली जाणार असल्याने ती कशा पद्धतीने होईल, याबाबत आतापासूनच शंका उपस्थित केल्या जात आहेत. ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत २००४ पासून शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. सुरुवातीला पाच वर्षे महापालिकेने हे काम करून १९ हजार ५०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले. परंतु, या काळात कुत्र्यांच्या वाढीचे प्रमाण सहा टक्क्यांच्या घरात होते. त्यानंतर, हेच काम पालिकेने खाजगी संस्थेला दिले. आतापर्यंत महापालिका आणि संस्थेच्या माध्यमातून ३९ हजार ५१५ भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अद्यापही पाच ते सहा हजार कुत्र्यांवरील शस्त्रक्रिया शिल्लक असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु, मागील महिन्यात मुंब्य्रात एका भटक्या कुत्र्याने मुलाचा चावा घेतल्यानंतर हा विषय स्थायी समितीच्या बैठकीत चांगलाच गाजला. निर्बीजीकरणाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. स्थायीच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत या कामासाठी पालिकेने ५.५० कोटींचा निधी खर्च केला आहे. ही विदारक परिस्थिती असताना आता आरोग्य विभागाने भटक्या कुत्र्यांची गणना करण्याचे निश्चित केले आहे. आतापर्यंत केलेल्या शस्त्रक्रियांवर केंद्र शासनाच्या अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डाकडून २२ लाख ९२ हजार ६४० रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. परंतु, बोर्डाने ४ सप्टेंबर २०१३ रोजीच्या पत्रानुसार भटक्या कुत्र्यांची गणना झाल्याशिवाय अनुदान मिळणार नसल्याचे स्पष्ट केले. डब्ल्यूएचओ संस्थेमार्फत जाहीर प्रचलित पद्धतीप्रमाणे स्थानिक लोकसंख्येच्या अंदाजे २-३ टक्के मोकाट श्वानांची संख्या गृहीत धरून ठाणे महापालिका हद्दीतील सध्या शस्त्रक्रिया झालेले व शिल्लक (नर-मादी- पिलावळ) असलेल्या एकूण कुत्र्यांची संख्या निश्चित होत नव्हती.