Join us

काळाचौकीचा महागणपती आगमन सोहळा

By admin | Published: August 24, 2015 1:08 AM

परळ कार्यशाळा ते काळाचौकीदरम्यान निघालेल्या ‘काळाचौकीचा महागणपती’च्या आगमन सोहळ्याने रविवारी सर्वांचेच लक्ष वेधले. कोकणातील पालखी नाचवणारे

मुंबई : परळ कार्यशाळा ते काळाचौकीदरम्यान निघालेल्या ‘काळाचौकीचा महागणपती’च्या आगमन सोहळ्याने रविवारी सर्वांचेच लक्ष वेधले. कोकणातील पालखी नाचवणारे मंडळ, पुणेरी आणि नाशिक ढोल पथके, वारकऱ्यांची दिंडी आणि साहसी खेळांच्या देखाव्यांनी हजारो तरुणांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.हीरक महोत्सवी वर्षानिमित्त काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदाच्या आगमन सोहळ्यास खास मेहनत घेतल्याचे दिसले. आगमन सोहळ्यात सामील झालेल्या पालखी नाचवणाऱ्या मंडळाने विशेष लक्ष वेधले. गणपतीची पावले पालखीत ठेवून ताशाच्या तालावर पालखी खांद्यावर आणि डोक्यावर घेऊन कार्यकर्ते नाचवत होते. त्यापुढे चालणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीने ताल धरला होता.नाशिक ढोल आणि ब्रास ब्रॅण्डमध्ये रंगलेल्या चुरशीवर तरुणाई बेफान होऊन नाचताना दिसली. मात्र खरी गर्दी होती ती गणेशगल्लीसमोर. डोक्यावर भगवे फेटे घालून तरुण आणि तरुणींचे गिरगाव ध्वजपथक महागणपतीच्या आगमन सोहळ्यात सामील झाले. त्यानंतर सोहळ्यात एकच दणदणाट सुरू झाला. पारंपरिक वेषभूषेत तरुण-तरुणी या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. लालबाग परिसरातील वाहतूक थांबवून तरुणाई रस्त्यावर नाचत होती. लालबाग उड्डाणपुलावरून आणि उड्डाणपुलाखाली बघ्यांनी एकच गर्दी केली होती. काळाचौकीच्या महागणपतीचे पहिलेवहिले दर्शन घेताना भाविकांचे हात आपसूकच जोडले गेले.राज्याचे साहसी खेळ असलेल्या तलवारबाजी आणि दांडपट्ट्याच्या खेळाने सोहळ्याला चार चाँद लावले. या खेळांचे चित्रीकरण करण्यासाठी चहूबाजूंनी बघ्यांनी कॅमेरे लावले होते. ‘लालबागचा राजा’ मंडळानेही महागणपतीचे स्वागत करण्यासाठी फटाक्यांची आतशबाजी केली. नऊवार साडी नेसलेल्या महिला आणि सदरा-लेंगा परिधान केलेल्या पुरुष कार्यकर्त्यांमुळे पारंपरिक सोहळा नयनरम्य ठरला. (प्रतिनिधी)