Join us

येऊरच्या बछड्याचे तीन किलो वजन वाढले; चोवीस तास नजर ठेवण्यासाठी टीमची नेमणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 5:39 AM

बछड्याच्या हालचाली जास्त वाढत असल्यामुळे बछड्याला बंगला क्रमांक ८ येथे न ठेवता वनअधिकाऱ्यांचे जुने क्वॉर्टस बंद अवस्थेत आहेत.

- सागर नेवरेकरमुंबई : येऊरच्या जंगलात बिबट्या मादीने आपल्या बछड्याला बेवारस सोडून दिले होते. तो मॉर्निंगवॉकला गेलेल्या नागरिकांना आढळून आल्यानंतर आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या बछड्याची काळजी घेत आहे. सध्या बछड्याचे वजन ३ किलो २० ग्रॅम एवढे वाढले आहे. तसेच त्याच्या हालचाली दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे बछड्याला बुधवारी वनअधिकाऱ्यांच्या जुन्या क्वॉर्टसमध्ये ठेवण्याचा निर्णय उद्यान प्रशासनाने घेतला आहे.बछड्याच्या हालचाली जास्त वाढत असल्यामुळे बछड्याला बंगला क्रमांक ८ येथे न ठेवता वनअधिकाऱ्यांचे जुने क्वॉर्टस बंद अवस्थेत आहेत. तिथे बछड्याला ठेवण्याचा निर्णय उद्यान प्रशासनाने घेतला आहे. सद्यस्थितीला बछडा अडीच ते तीन फुटांपर्यंत उडी मारायला शिकला आहे. तसेच त्याच्यासमोर कोणतीही वस्तू ठेवल्यावर तो लगेच झडप टाकून आपल्या पंजामध्ये पकडून ठेवतो, अशा प्रकारच्या हालचाली करू लागला आहे. बछडा पहिल्यापेक्षा जास्त आरोग्यदायी आणि आनंदी आहे. बछड्यावर चोवीस तास नजर ठेवण्यासाठी टीम नेमण्यात आली असून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.माती आणि गवत बछड्याच्या पायाला लागणे आवश्यक आहे. म्हणून त्याला जास्त वेळ बाहेर मोकळ्या जागेत ठेवले जाते. विविध वस्तू तो वासावरून ओळखू लागला आहे, अशी माहिती व्याघ्र व सिंह विहाराचे वनपरिक्षेत्र अधिकारी (अधीक्षक) विजय बारब्दे यांनी दिली.वेळोवेळी आरोग्य तपासणीबिबट्याच्या बछड्याचे वजन ३ किलो २०० ग्रॅम झाले आहे. सुरुवातीला चिकन सूप सुरू करण्यात आले होते. आता सूप बंद करून फक्त चिकन सुरू आहे. दिवसातून पाच वेळा बछड्याला चिकन दिले जाते. याशिवाय त्याची वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जाते, अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी दिली.

टॅग्स :मुंबई