मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरच्या जंगलात सापडलेल्या बेवारस बिबट्याच्या बछड्याचे संगोपन केले जात आहे. उद्यान प्रशासनाने आता या बछड्याला दिवसातून पाच ते सहा वेळा चिकन सूप व बोनलेस चिकनचे तुकडे असा खुराक सुरू केला आहे. सध्या त्याची प्रकृती ठणठणीत असल्याचे उद्यान प्रशासनाने सांगितले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे म्हणाले, बछड्याला दिवसातून पाच ते सहा वेळा चिकन सूप दिले जाते. तो चिकन सूप आवडीने पितो. तसेच त्याला बोनलेस चिकनचे बारीक बारीक तुकडेही खाण्यासाठी दिले जातात. सुरुवातीच्या काही महिन्यांपर्यंत बछड्याला दुधावर ठेवण्यात आले होते. परंतु जसजसा बछडा मोठा होत जातो, तसतशी त्याची भूक वाढत जाते. त्याप्रमाणे त्याचा खुराक सुरू करण्यात आला आहे.