मुंबई : येऊरच्या जंगलात आईने सोडलेला सात ते आठ दिवसांचा बिबट्याचा बछडा काही दिवसांपूर्वी सकाळच्या सुमारास स्थानिकांच्या निदर्शनास आला होता. लगोलग त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. सध्या हा बछडा उद्यानातील व्हीआयपी बंगला क्रमांक ८ येथे आहे. त्याच्या सेवेसाठी दहा जणांची टीम दिवस-रात्र कार्यरत असते. झोपण्यासाठी बिछाना, दिवसातून चारवेळा दूध व सीसीटीव्ही कॅमेरांची निगराणी इत्यादी सुविधांमध्ये त्याला ठेवण्यात आले आहे. मात्र, उद्यान प्रशासन पुन्हा चौथ्यांदा आईची भेट घडविण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
व्याघ्र व सिंह विहाराचे वनपरिक्षेत्र अधिकारी (अधीक्षक) विजय बारब्दे म्हणाले, बछड्याला अतिदक्षता विभागामध्ये ठेवले आहे. तसेच २४ तास वनअधिकारी व वनरक्षकांच्या देखरेखीखाली ठेवले आहे. जवळपास दहा जणांची टीम बछड्यासाठी झटत आहे.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आठ क्रमांकाच्या रेस्ट हाउसमध्ये बछड्याला ठेवले आहे. इतर प्राण्यांचा त्रास होऊ नये, म्हणून त्याला एकांतवासात ठेवण्याचा निर्णय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतला. सीसीटीव्ही कॅमेºयामार्फत बछड्यावर लक्ष ठेवले जात असून त्यासाठी २ कॅमेरे लावले आहेत. त्यापैकी एक त्याच्या खोलीत आणि तर एक अंगणात आहे.
तसेच त्याची काळजी घेणाºया कर्मचाऱ्यांना आंघोळ करून आणि विशिष्ट रासायनिक द्रव्याचा वापर करून हात-पाय धुऊन मगच बछड्याजवळ जाऊ दिले जाते. विशेषत: मानवाकडून त्याला कोणताही संसर्ग होऊ नये, याची काळजी घेतली जाते.
दिवसभरात बछड्याला सकाळच्या कोवळ्या उन्हात व सायंकाळी बाहेर फिरण्यासाठी सोडले जाते. सकाळी ९, दुपारी १, सायंकाळी ४ आणि रात्री ९ वाजता असे दिवसभरातून चारवेळा बछड्याला दूध दिले जाते. आता बछड्याचे वजन ७०० ग्रॅम झाले आहे. तसेच व्हिटॅमिन्स आणि सप्लिमेन्ट सुरू आहेत. त्याला झोपण्यासाठी एका बॉक्समध्ये ब्लॅन्केट ठेवण्यात आले आहे, जेणेकरून त्याला ऊब मिळावी. आता बछडा एकदम तंदुरुस्त आहे.-डॉ. शैलेश पेठे,संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी