Join us  

पोलिसांचा कॉल आणि साडे सहा लाखांच्या दागिन्यांवर हात साफ

By मनीषा म्हात्रे | Published: September 02, 2022 9:21 PM

मेव्हणीच्या लग्नासाठी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करायची असल्याचे सांगितले.

मुंबई : मेव्हणीच्या लग्नासाठी दागिन्यांची खरेदी करुन ठगाने एका पोलिसाच्या अोळखीतून फोन करत दागिन्याची खरेदी करुन सराफाला साडे सहा लाखांना गंडवल्याची घटना विक्रोळीमध्ये घडली आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत पार्कसाईट पोलीस अधिक तपास करत आहेत.

घाटकोपर परिसरात राहण्यास असलेले सोने व्यापारी मेहता (४९) यांचे विक्रोळीतील पार्कसाईट परिसरात दागिन्यांचे दुकान आहे. पार्कसाईट पोलीस ठाण्यातील एका ओळखीच्या पोलिसाने त्यांना ११ एप्रिल रोजी काॅल करुन त्यांचा मित्र दत्तात्रय कांबळे याला मेव्हणीच्या लग्नासाठी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करायची असल्याचे सांगितले. त्यानंतर कांबळे हा एका महिलेसोबत मेहता यांच्या दुकानात पोहचला. त्याने सोन्याचे मंगळसुत्र, सोनसाखळी आणि सोन्याच्या अंगठ्या असे एकूण ०६ लाख ६२ हजार रुपये किंमतीचे ११४.८० ग्रॅम वजनाच्या दागिन्यांची खरेदी केली.

दागिन्यांची झालेली बिलाची रक्कम त्याने दागिन्यांच्या बिलाचे ०५ लाख ६२ हजार रुपयेसूद्धा पाठविल्याचे संदेश मेहता यांना दाखविले. मात्र मेहता यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली नाही. काही वेळात रक्कम खात्यात जमा होईल असे सांगून कांबळे हा दागिने घेऊन तेथून निघून गेला. दुसऱ्या दिवशीही खात्यात पैसे जमा न झाल्याने मेहता यांनी कांबळे याला काॅल करुन याबाबत विचारणा केली असता गावी आल्याने रक्कम ट्रान्सफर होत नसेल असे त्याने सांगितले. पूढे कांबळे याने धनादेशाच्या माध्यमातून खात्यात रक्कम भरत असल्याचे मेहता यांना सांगितले.

कांबळे हा मेहता यांना रक्कम धनादेश तसेच आरटीजीएस व्दारे पाठवत असल्याची वेगवेगळी कारणे देत होता. त्यानंतर मेहता यांनी पुणे येथे जाऊन तेथे कांबळे याची भेट घेतली. तेथेही त्याने मेहता यांना कारणे सांगून बनाव केला. त्यानंतर ना खात्यात रक्कम जमा झाली. ना कांबळे याला दिलेले सोन्याचे दागिने परत मिळाले. अखेर आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने महेता यांना पार्कसाईट पोलीस ठाणे गाठून या फसवणूकीची तक्रार दिली आहे.

टॅग्स :मुंबई