मुंबई - कोरेगाव-भीमा, सणसवाडी येथे दोन गटांत उफाळलेल्या संघर्षाचे हिंसक पडसाद मुंबईसह राज्यात उमटत आहेत. या घटनेचा निषेध करत आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने मुंबईतील रस्त्यांवर उतरले आहेत. भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे
Live Updates
मुंबई :-
दादर स्थानकात रेल्वेरोको
नायगाव, भोईवाडा, दादर परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी रास्ता आणि रेलरोको आंदोलन केले. नायगावाच्या लोकसेवा संघातून रॅलीला सुरुवात झाली होती. शिवडीमार्गे भोईवाड्यात ही रॅली आल्यानंतर मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले. हिंदामाता परिसरातून जाणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर आंदोलकांनी काही वेळासाठी रास्ता रोको आंदोलन केले.
आंदोलकांनी सायन आणि परेलच्या दिशेने जाणारी वाहतूक रोखून धरली होती. पोलिसांनी या आंदोलकांना तिथून हटवल्यानंतर आंदोलक दादर रेल्वे स्थानकांच्या दिशेने गेले. रेल्वे स्थानक परिसरात घुसण्यास या आंदोलकांना मज्जाव करण्यात आला. पोलिसांबरोबर संघर्ष झाल्यानंतर हे आंदोलक रेल्वे स्थानक परिसरात घुसले. त्यांनी मध्य आणि पश्चिम दोन्ही मार्गावर रेल रोको आंदोलन केले. जवळपास 17 मिनिटे त्यांचे हे आंदोलन सुरु होते.
पोलिसांनी आंदोलकांना रुळावरुन हटवल्यानंतर बाहेर येऊन आंदोलकांनी घोषणाबाजी केली व आंदोलन समाप्त झाले. महिला, लहान मुले मोठया संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
नालासोपारा स्टेशनवर ट्रॅकवर उतरुन आंदोलन, वाहतूक विस्कळीत; रेल्वे प्रशासनाकडून आंदोलकांना हटवून रेल्वे सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न- बांद्रा जंक्शन परिसरात आंदोलकांमुळे वाहतुकीचा खोळंबा- सुरक्षिततेचा उपाय म्हणून पश्चिम रेल्वेची वातानुकूलित लोकल रद्द, पश्चिम रेल्वेचा निर्णय - गोंवडी, मानखुर्द, मुलुंड, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, कांदिवली पूर्व, मालाड पूर्व, दहिसर पूर्वच्या शाळा बंद. सुरू असलेल्या शाळांमध्ये ३० ते ४०% विद्यार्थ्यांची हजेरी - मुंबई मुख्याध्यापक संघटनेची माहिती
- दुपारी 1 वाजेपर्यंत बेस्टच्या 48 बसची तोडफोड करण्यात आली. या घटनेत काचा लागून 4 बसचालक जखमी झाले आहेत.
कांजूरमार्ग रेल्वे स्टेशनवर तोडफोड, स्टीलच्या खुर्च्या तोडून फेकल्या ट्रॅकवर
कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर बुधवारी दुपारी जमावाने मोठया प्रमाणात तोडफोड केली. रेल्वे स्टेशनवरील स्टीलच्या खुर्च्या तोडून ट्रॅकवर फेकण्यात आल्या होत्या. जमावाने स्टीलच्या चेअर्स, टयुबलाईट वॉटरवेंडिग मशीनची तोडफोड केली. स्थानक परिसरातील जाहीरात बोर्डाचे फलकही फाडण्यात आले होते. सध्या कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरात शुकशुकाट असून, रेल्वेचे कर्माचरी रुळावर फेकण्यात आलेल्या स्टीलच्या चेअर्स आणि अन्य साहित्य रुळावरुन हटवत आहेत. \
ठाणे स्थानकात आंदोलनकर्त्यांनी ट्रॅकवर उतरुन घोषणाबाजी केली. शिवाय, रेलरोकोदेखील केला. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 2 वर आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी यावेळी मोदी सरकारविरोधात नारेबाजीदेखील केली. दरम्यान खबरदारी म्हणून ठाणे शहरात 4 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
पुणे : - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यभरात सुरु असलेली शासकीय कॉम्प्युटर टायपिंग परीक्षा (जीसीसी-टीबीसी) रद्द, आजची परीक्षा रविवारी 7 जानेवारीला होणार
पिंपरी - चिंचवड : - वल्लभनगर एसटी आगर बंद असल्यानं सर्वसामान्य प्रवाशांचे हाल, एसटी स्टँडवर अडकले प्रवासी.
धुळे : - महामार्गावर तालुक्यातील कुसुंबाजवळ रस्त्यावर टायर जाळण्यात आले. आठवडे बाजार बंद करण्यात आला आहे. महामार्गावरील वाहतूकदेखील ठप्प झाली आहे.
नाशिक : - भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पंचवटी परिसरात अल्प प्रतिसाद मिळाला आहे. बस सेवा 10.30 वाजता बंद करण्यात आली. काही शाळांना सुट्टी जाहीर.
उल्हासनगरमध्ये बंद
भीमा-कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ उल्हासनगरातील रिक्षांसह दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली. आंबेडकरी जनतेने शांततेने बंदच्या दिलेल्या आवाहनाला व्यापारी, दुकानदार यांनी साथ दिली.
मुंबईतील मल्टिप्लेक्स व सिंगल स्क्रीनमधील 'शो' रद्द मुंबईतील मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीनमधील चित्रपटांचे शो रद्द करण्यात आले आहेत. पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदने राज्यातील अनेक भागात हिंसक वळण घेतले आहे. मुंबईत सुद्धा काही ठिकठिकाणी हिंसक आंदोलने सुरु आहेत. येथील फिल्मसिटीत रस्ते आंदोलनकर्त्यांनी अडवल्याने हिंदी मालिकांचे शूटिंगही बंद करण्यात आले आहे. तर, शहरातील अनेक चित्रपटगृहातील मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीनमधील चित्रपटांचे शो रद्द करण्यात आले आहेत. याचबरोबर, दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात होणारा ढाई अक्षर प्रेम के या नाटकाचा शो सुद्धा रद्द करण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबईतील कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर आज दुपारी आंदोलकांनी मोठया प्रमाणात तोडफोड केली. रेल्वे स्टेशनवरील स्टीलच्या खुर्च्या तोडून ट्रॅकवर फेकण्यात आल्या होत्या. तसेच, स्टीलच्या खुर्च्या आणि टयुबलाईट वॉटरवेंडिग मशीनची तोडफोड केली. स्थानक परिसरातील जाहीरात बोर्डाचे फलकही फाडण्यात आले होते. सध्या कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरात शुकशुकाट असून, रेल्वेचे कर्मचारी रुळावर फेकण्यात आलेल्या स्टीलच्या खुर्च्या आणि अन्य साहित्य ट्रॅकवरुन हटवत आहेत.घाटकोपरच्या आरसिटी मॉलजवळ तणावघाटकोपरच्या एलबीएस रोडवरील आरसिटी मॉलच्या मागे जाळपोळ करण्यात आली आहे. काही गाडया फोडण्यात आल्या आहेत. टायर जाळण्यात आले आहेत. आरसिटी मॉलच्याजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.कल्याण-डोंबिवलीत आंदोलनाला हिंसक वळणभीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला कल्याण-डोंबिवलीत हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी डोंबिवलीत रेल्वे स्थानकातील तिकिट खिडकीच्या काचा फोडल्या. कल्याणच्या पत्री पुलावर अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. संतप्त जमावाने कल्याण पश्चिमेतील शिवसेनेची मध्यवर्ती शाखा तोडल्याचे वृत्त आहे. कल्याणच्या शिवाजी चौकात आंदोलकांचा मोठा जमाव जमला आहे.
डोंबिवली :डोंबिवली रेल्वे स्थानकात कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी लोहमार्ग पोलिसांनी 2 अधिकारी, 30 कर्मचारी तर आरपीएफनं 4 अधिकारी, 24 कर्मचारी असा ताफा बंदोबस्तात तैनात केला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 व पादचारी पूल अशा सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जाणून घ्या काय आहे भीमा-कोरेगाव प्रकरण?
पुणे-नगर महामार्गावरील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी (1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झालं. सोमवारी भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणाऱ्या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. सणसवाडीतील वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे.
मृत व्यक्तीच्या कुटुंबास 10 लाख रुपयांची मदत भीमा कोरेगाव : हिंसाचारात झालेल्या एका मृत्यूची सीआयडीमार्फत चौकशी केली जाईल. मृत व्यक्तीच्या कुटुंबास १० लाख रुपयांची मदत दिली जाईल. या शिवाय, ज्यांच्या वाहनांची तोडफोड झालेली आहे, त्यांना नुकसानभरपाई राज्य शासनाच्या वतीने दिली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
भिडे, एकबोटे यांच्यावर गुन्हा : सामाजिक कार्यकर्त्या अनिता साळवे यांच्या तक्रारीनंतर शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे (गुरुजी) व हिंदू जनजागरण समितीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांच्यावर अॅट्रॉसिटी, जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, सशस्त्र हल्ला, बेकायदेशीर जमाव जमविणे व असंघटित गुन्हेगारी आदी कलमान्वये पिंपरीत गुन्हा दाखल करण्यात आला.
चौकशी करा : आठवलेअनेक वर्षांपासून त्या ठिकाणी लाखो कार्यकर्ते येतात, पण अनुचित प्रकार घडला नाही. काही लोकांनी जाणीवपूर्वक हा हल्ला केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. ज्या लोकांनी हिंसा भडकावली, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
पवारांनी ठेवला प्रशासनावर ठपकाभीमा-कोरेगावच्या लढाईला २०० वर्षे झाल्यानिमित्त मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील, याची प्रशासनाला कल्पना असतानाही खबरदारी घेण्यात आली नाही. याचा गैरफायदा घेण्यास काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुणे शहरातून येऊन काही दिवसांपासूनच चिथावणी देण्याची भूमिका घेतल्याचे वढू येथील ग्रामस्थ सांगतात. लोकांनी कोणतेही प्रक्षोभक भाष्य न करता, योग्य प्रकारे ही स्थिती हाताळणे आवश्यक आहे, असे आवाहन शरद पवार यांनी केले.