मराठा क्रांती मोर्चाकडून बंदची हाक; अत्यावश्यक सेवांना बंदमधून वगळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 04:25 AM2018-07-25T04:25:13+5:302018-07-25T04:26:17+5:30
मराठा क्रांती मोर्चातर्फे आज मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही बंदची हाक देण्यात आली आहे.
मुंबई : मराठा क्रांती मोर्चातर्फे बुधवारी मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही बंदची हाक दिली आहे. मात्र स्कूल बस, दूध टँकर, रुग्णवाहिका अशा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना व सेवांना बंदमधून वगळण्यात आले आहे.
मराठा क्रांती मोर्चातर्फे उर्वरित महाराष्ट्रात मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आला असला, तरी पंढरपूरहून मुंबईसह नजीकच्या जिल्ह्यांत परतणाºया वारकºयांना कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून मंगळवारऐवजी बुधवारी बंदचे आवाहन केल्याचे समन्वयकांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांच्या निषेधाचा ठरावही या बैठकीत करण्यात आला. तसेच राज्य शासनाने घोषित केलेली मेगाभरती मराठा आरक्षण मिळेपर्यंत स्थगित करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. जोपर्यंत सरकार संबंधित मागण्या पूर्ण करीत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचेही मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट केले आहे.
मुंबईत कडेकोट बंदोबस्त
मुंबई : मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने मुंबईत पार पडणाºया आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांच्या विशेष शाखेचा या आंदोलनावर वॉच असणार आहे. सोशल मीडियावरील प्रत्येक हालचाली सायबर सेलच्या रडारवर असणार आहेत़ सर्व पोलीस ठाण्यांतील पोलिसांकडून विभागातील बारीक हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच काही पोलीस साध्या वेशात या आंदोलनात सहभागी होत सर्व हालचालींवर लक्ष ठेवून असणार आहेत.
शहरातील सीसीटीव्हींच्या माध्यमातून नियंत्रण कक्षही अलर्टवर आहे. सोशल मीडियाच्या हालचालींवर सायबर सेलच्या अधिकाºयांचे लक्ष आहे.
आंदोलनावेळी समाजकंटकांकडून काही अनुचित प्रकार घडवला जाऊ नये यासाठी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने संपूर्ण राज्यात घडणाºया हालचालींवर बारीक नजर ठेवली आहे. विशेष शाखेकडून सर्व घटनांचा आढावा घेतला जात आहे.
मुंबई पोलिसांसह राज्य राखीव सुरक्षा बल, केंद्रीय सुरक्षा बल, शीघ्रकृती दल (क्यूआरटी), फोर्स वन, बॉम्ब शोधक व नाशक पथक, राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) शहरात तैनात आहे.
मराठा क्रांती मोर्चाची आचारसंहिता
हे करावे!
1. मराठा तरुणांनी हा बंद शांततापूर्ण वातावरणात पार पाडायचा आहे. आंदोलनात घुसून तोडफोड करणाºया प्रवृत्तीपासून समाजाची बदनामी होणार नाही, याबाबत जागरूक राहून बंद यशस्वी पार पाडावा.
2. कोणत्याही प्रकारच्या इतर समाजाच्या भावना दुखावणाºया आणि सामाजिक तेढ निर्माण करण्यापासून स्वत:ला आणि इतरांना आवर घालावा.
3. इतर समाज बांधवांनी कृपया हे आंदोलन शासनासोबत असल्याने मराठा समाजाला सहकार्य करावे, जेणेकरून आपल्या सर्वांचे प्रश्न मार्गी लागतील.
4. प्रक्षोभक पोस्ट, व्हिडीओ व्हायरल न करता आपआपल्या जिल्ह्यांतील समन्वयक मराठा सेवकाांशी संपर्क ठेवून पोलीस प्रशासनाला गैरप्रकार करणाºया लोकांची माहिती द्यावी.
5. कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडून आंदोलन चिघळले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
6. आपल्या समस्या सोडविणे सर्वपक्षीय नेत्यांची जबाबदारी होती आणि राहील. आपण आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर असून राजकारणासाठी नाही, याची जाणीव सर्वांनी ठेवून कृती करावी.
हे करू नये!
1. मराठा समाजाचा आक्रोश हा राजकीय पक्ष आणि सरकारविरोधी असून त्याला जातीय रंग देऊ नये.
2. रुग्णवाहिका आणि अतिमहत्त्वाच्या सेवा देणाºया सेवा दवाखाने, मेडिकल यांच्यावर बंदसाठी दबाव टाकू नये.
3. या आंदोलनादरम्यान घोषणा आणि आपला आक्रोश व्यक्त करीत असताना अश्लील भाषा आणि अनुचित प्रकाराचा वापर करू नये.
4. पोलीस प्रशासनाशी हुज्जत न घालता त्यांच्याशी समन्वय साधून आंदोलन यशस्वी करावे.
5. पोलीस प्रशासनाने आंदोलन दाबून टाकण्याचा प्रयत्न करून वातावरण चिघळू देऊ नये.
6. महिला आणि मुले यांना त्रास होणार नाही किंवा त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
7. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये; अथवा गोंधळ माजेल अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकू नयेत.
8. कोणत्याही प्रकारे या आंदोलनाला राजकीय वळण लागू देऊ नये.