मुंबई : बेस्ट कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी आढावा बैठक झाली. बेस्ट सेवा सामान्यांसाठी आवश्यक असून ती सुरळीत चालायला हवी. तसेच बेस्ट कामगारांचे प्रश्नही सुटायला हवेत. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून बैठक बोलावणार असल्याचे प्रतिपादन नाना पटोले यांनी केले.बेस्टच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. बेस्ट समिती आणि मुंबई महानगरपालिका यांच्यात झालेल्या ठरावानुसार बेस्टच्या व्यवस्थापनाची जबाबदारी महापालिकेवर आहे. पालिकेने या जबाबदारीचे पालन करायला हवे. तसेच बेस्टच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठीही पुढाकार घ्यायला हवा. नियमित पगार व्हायला हवेत, कामगारांवर अन्याय होणार नाही याची दक्षता महापालिकेने घ्यायला हवी, असेही पटोले यांनी या वेळी सांगितले. शिवाय, पालिका आयुक्तांनी बेस्ट अर्थसंकल्पाचे पालिका अर्थसंकल्पातील विलीनीकरणाचा प्रस्ताव तातडीने राज्य सरकारकडे पाठवावा, असेही स्पष्ट केले.या वेळी बेस्ट उपक्रमातील अतिरिक्त मनुष्यबळाची कपात करू नये, कंत्राटी पद्धतीने बसवाहकांच्या नियुक्तीचा निर्णय मागे घ्यावा, विनावाहक बसगाड्या चालविण्याचा निर्णय रद्द करावा, सेवानिवृत्त कामगारांच्या अंतिम देयकाची रक्कम तातडीने द्यावी आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. कामगारांच्या प्रलंबित मागण्या लवकर पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देशही विधानसभा अध्यक्षांनी या वेळी दिले.याप्रसंगी बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे, कर्मचारी व्यवस्थापक शंकर नायर, बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष अरविंद कादीनकर, जनरल सेक्रेटरी शशांक राव, बेस्ट एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष नितीन पाटील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बेस्ट कामगारांच्या मागण्यांसाठी बैठक बोलावू - नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 12:54 AM