अलिबाग : आगरी समाजातील जातपंचायतीने समाजातून वाळीत टाकल्याप्रकरणीच्या खटल्याची येथील जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक, अलिबाग उपविभागीय महसूल अधिकारी, अलिबाग तहसीलदार, रायगड जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. जुईली टेमकर, शहाबाज ग्रामपंचायत सरपंच धनंजय म्हात्रे आणि पोयनाड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना साक्षी नोंदवण्यास बोलावावे, अशी मागणी करणारा अर्ज कमळपाडा गावातील ८० वाळीतग्रस्त कुटुंबांची न्यायालयात बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील अॅड. असीम सरोदे यांनी गुरुवारी दाखल केला आहे.
८० वाळीतग्रस्तांना न्याय मिळवून देण्याकरिता आवश्यक पुरावे न्यायालयासमोर येणे आवश्यक आहे. वाळीतग्रस्तांनी अनेक तक्रारी पोयनाड पोलीस ठाणे, रायगड जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, शहाबाज तंटामुक्ती समिती, अलिबाग उपविभागीय महसूल अधिकारी, शहाबाज ग्रामपंचायत सरपंच, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे दाखल केल्या आहेत. यासंदर्भात वाळीतग्रस्त आणि आरोपी यांच्या संयुक्त बैठका काही शासकीय अधिकाऱ्यांबरोबर झाल्या आहेत, हे या संबंधितांच्या साक्षीतून येऊ शकते, असे निवेदन न्यायालयाकडे केले आहे.
कोणत्याही खटल्यात जर अधिकाधिक पुरावे उपलब्ध होऊ शकत असतील, तर ते उपलब्ध करून घेण्यासंदर्भात सीआरपीसी कायदा कलम ३११ अन्वये तरतूद आहे. अशा प्रकारे पुरावे मोहनलाल श्यामजी सोनी विरुद्ध भारत सरकार या खटल्यात वापरण्यात आले होते. त्या निवाड्याची प्रतदेखील अर्जासोबत न्यायालयास सादर केल्याची माहिती अॅड. सरोदे यांनी दिली आहे.