म्हाडाच्या अविकसित भूखंडाना 'कुंपण' घालण्यासाठी निविदा मागवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:06 AM2021-03-27T04:06:33+5:302021-03-27T04:06:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: म्हाडाच्या जमिनीचा बेकायदेशीर वापर टाळण्यासाठी त्यावर कुंपण घालण्यात येणार आहे. याबाबतचे वृत्त 'लोकमत' ने प्रकाशित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: म्हाडाच्या जमिनीचा बेकायदेशीर वापर टाळण्यासाठी त्यावर कुंपण घालण्यात येणार आहे. याबाबतचे वृत्त 'लोकमत' ने प्रकाशित केले होते. त्यानुसार त्यासाठी आता निविदा मागविण्याचे आदेश म्हाडाच्या उपसभापतींनी दिले आहेत. त्यामुळे म्हाडाच्या जमिनीचा बेकायदेशीर वापर करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणणार आहे.
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर व म्हाडा उपाध्यक्ष अनिल डिगीकर यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. घोसाळकर यांनी नुकतीच मालवणीतील म्हाडा कॉलनीला भेट दिली.
तेव्हा त्याठिकाणी खेळाच्या मैदानावर तसेच उद्यानाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात लग्नाचे मंडप कायमस्वरूपी बांधण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार या जागांवर आता भिंतीचे कुंपण घालण्यात येणार असून त्यासाठी निविदा मागविण्याचे आदेश डिगीकर यांनी दिल्याचे घोसाळकर यांनी सांगितले. मालवणीतील म्हाडाच्या जमिनीचा बेकायदेशीर वापर टाळण्यासाठी त्या ताब्यात घेत त्याला कुंपण घालण्यात यावे, अशी मागणी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी केली होती. २० मार्चच्या अंकात 'म्हाडा' ची जमीन ताब्यात घेत त्याला 'कुंपण' घाला' या मथळ्याखाली याबाबतचे वृत्त छापत 'लोकमत' ने हा प्रकार उघडकीस आणला होता.
बऱ्याच मोकळ्या मैदानाचा वापर हा गर्दुल्ले आणि नशेचे सेवन करणाऱ्यांकडून होत असल्याने कुंपणामुळे म्हाडाच्या जमिनीचा गैरवापर थांबेल असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त होत असून त्यांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे.
तयार करणार 'नवीन धोरण' '
म्हाडाच्या संक्रमण शिबिराच्या बैठ्याचाळी संस्था चालकांना शाळा चालविण्यासाठी, महापालिका तसेच वसाहतीसाठी देण्यात आल्या आहेत. मात्र, यातील बऱ्याच शाळा बंद आहेत, तसेच वसाहतीदेखील अडगळीच्या जागी असल्याने धोकादायक बनल्या आहेत. त्यानुसार या वास्तुदेखील म्हाडा ताब्यात घेत नवीन धोरण तयार करण्याच्या प्रयत्नात आहे.
( विनोद घोसाळकर - सभापती, म्हाडा-इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ)