Join us

ह्याला म्हणतात संशोधन; KDMC ने शोधून काढलं खड्डे पडण्याचं खरं कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 10:20 AM

केडीएमसीने जावईशोध लावत रस्त्यांवरील या खड्ड्यांना पाऊसच जबाबदार असल्याचे म्हटले. त्यामुळे एकप्रकारे रस्ते कंत्राटदार आणि पालिका प्रशासनाला क्लीनचीटच दिली.

मुबई - राज्यातील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच मुंबईसह परिसरातील खड्ड्यांमुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. ऐन पावसाळ्यात खड्ड्यांमुळे वाहतुकीचे मार्ग बदलावे लागत आहेत. 15 मिनिटांचा रस्ता पार करण्यासाठी चक्क एक तासांचा वेळ द्यावा लागतो. याशिवाय खड्ड्यांमुळे वाहनाचे होणारे नुकसान वेगळेच. मात्र, केडीएमसीने जावईशोध लावत रस्त्यांवरील या खड्ड्यांना पाऊसच जबाबदार असल्याचे म्हटले. केडीएमसीने लावलेल्या फलकांमध्ये संततधार पावसामुळेच रस्त्यांवर खड्डे पडल्याचे सांगण्यात आले आहे. 

कल्याण डोंबिवली महापालिकेने कल्याण-डोंबिवलीतील महत्त्वाच्या चौकात 50 डीजिटल फलक लटकवले आहेत. या फलकमधून नागरिकांना खड्ड्यांपासून स्वत:चा जीव वाचविण्याचे आवाहनही केले आहे. काही दिवसांपूर्वीच, रस्त्यांवरील खड्डेच केवळ अपघातातील मृत्यूचे कारण होऊ शकत नाही, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांनंतर, राज्यभरातून त्यांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात आला. तर त्यांच्या वक्तव्यानंतर केवळ 48 तासांतच केडीएमसीने रस्त्यांवरील खड्यांचे खापर पावसावर फोडले आहे. मात्र, या जीवघेण्या खड्ड्यांसाठी ना पालिका प्रशासनाला जबाबदार धरले न रस्त्यांचा ठेका घेणाऱ्या कंत्राटदाराला. याउलट केडीएमनसे, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जीव जाऊ शकतो, त्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन डीजिटल फ्लेक्स लावून केले आहे. सावधान, संततधार पावसामुळे रस्त्यांवर खड्डे झाले आहेत. पावसामुळे खड्ड्यांचे प्रमाण अधिक वाढले असून रस्ते अतिशय खराब बनले आहेत. त्यामुळे वाहनचालक, विशेषत: दुचाकीस्वारांनी काळजीने प्रवास करावा, असे फलकच केडीएमसीने शहरातील 50 प्रमुख चौकात लावले.

केडीएमसी महापालिकेच्या महापौर विनिता राणे यांचे पती आणि शिवसेना नेते विश्वनाथ राणे यांनी या फलकांचे समर्थन केले आहे. हे फलक लावण्यात काहीही चुकीचे नसून दुचाकीस्वार आणि नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्याचा प्रयत्न महापालिकेने केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :कल्याण डोंबिवली महापालिकारस्ते सुरक्षापाऊस