Join us

बोलावले तर ठीक; अन्यथा जाणारच नाही

By admin | Published: January 24, 2017 5:25 AM

डोंबिवली ही जशी सांस्कृतिक नगरी आहे, तसाच येथे विविध संस्थांचा आधारवडही फुललेला आहे. ९० व्या अखिल भारतीय मराठी

जान्हवी मोर्ये / डोंबिवलीडोंबिवली ही जशी सांस्कृतिक नगरी आहे, तसाच येथे विविध संस्थांचा आधारवडही फुललेला आहे. ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अवघे १२ दिवस उरले असतानाही अनेक संस्थांना, काही मान्यवर व्यक्तींना निमंत्रणे न मिळाल्याने त्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. बोलावणे आल्यावाचून जाणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतल्याने आधी निधीच्या, नंतर कार्यक्रम आणि निमंत्रण पत्रिकेच्या भाऊगर्दीत सापडलेल्या आयोजकांना तातडीने शहरभर निमंत्रणे पोचवण्याची व्यवस्था करावी लागणार आहे.साहित्य हे पुस्तक किंवा ग्रंथ स्वरुपात येते. लेखक व वाचक यांच्यातील व्यवहार म्हणजे साहित्य पोचविण्याचे काम प्रकाशक, वितरक करतात. तेवढीच मोलाची भूमिका ग्रंथालये बजावतात. मात्र डोंबिवलीतील विविध ग्रंथालयांनाच विचारात घेतले नसल्याने संमेलनात कसे सहभागी व्हायचे, असा सवाल कोकण विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राजेंद्र वैती यांनी उपस्थित केला. कोकण विभागात मुंबई आणि उपनगरांसह ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग असे सात जिल्हे येतात. या सात जिल्ह्यात ५७४ ग्रंथालये आहेत. संमेलनाच्या आयोजनासंदर्भात सुरुवातीला डोंबिवलीत प्राथमिक बैठक पार पडली. त्यावेळी त्या बैठकीस कोकण विभागीय ग्रंथालय संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. संमेलनाचे आयोजक व आगरी यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांना ग्रंथालय संघाने ‘असे घडले संमेलन’ हा ग्रंथ दिला आणि संमेलनास सहकार्य करू असे सांगितले. त्यावेळी वझे यांनी ग्रंथालय संघास विचारात घेतले जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर आजपर्यंत पुन्हा एका शब्दानेही वझे यांनी ग्रंथालय संघाची विचारपूस केलेली नाही. वैती स्वत:हून संमेलनाच्या कार्यालयात गेले नाहीत. वझेंवर सर्व जबाबदारी असल्याने तिथे जाऊन त्यांना काही विचारणे प्रशस्त वाटले नाही. एखाद्या समितीच्या प्रमुखांची माहिती असती, तर त्यांच्याशी संपर्क साधता आला असता. परंतु समितीप्रमुखांविषयीही अनभिज्ञता असल्याने आम्ही संपर्क केला नाही. वझेंनी संघाला काही काम सांगितले, मदत मागितली तर संघाची मदत व काम करण्याची इच्छा आहे. वझे यांचे संमेलनासंदर्भातील व्हॉटसअ‍ॅपचे मेसेज मिळतात. त्यांच्याकडून कोणी स्वत:हून आमच्या भेटीला आलेले नाही. त्यामुळे आम्ही स्वत:हून कसे काय जायचे आणि आम्हाला काम द्या, असे म्हणायचे. हा अडचणीचा मुद्दा आमच्या ग्रंथालय संघासमोर असल्याची बाब वैती यांनी नमूद केली. पिंपरी-चिंचवड येथे पार पडलेल्या संमेलनाची निमंत्रण पत्रिका ग्रंथालय संघाला मिळाली होती. यंदाच्या संमेलनाची पत्रिकाच अद्याप छापून झालेली नसल्याने ती आम्हाला कधी मिळणार? आम्हाला बोलाविले जाईल की नाही याविषयी साशंकता आहे. बोलवणे आल्याशिवाय आम्ही जाणार नाही, असा पवित्रा वैती यांनी घेतला.