Join us  

झारखंडवरुन पैसे घ्यायला बोलवलं अन् थेट...; फेसबुक लाईव्हनंतर तरुणाने संपवली जीवनयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 3:53 PM

झारखंडच्या एका तरुणाने मुंबईत फेसबुक लाईव्ह करत आपली जीवनयात्रा संपवली आहे.

Mumbai Crime :मुंबईत झारखंडच्या एक व्यक्तीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फेसबुक लाईव्ह करत झारखंडच्या तरुणाने मृत्यूला कवटाळलं. तरुणाने एका मुलीवर आणि तिच्या कुटुंबीयांवर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. या छळाला कंटाळून तरुणाने फेसबुक लाईव्हनंतर आत्महत्या केली. तरुणाने केलेल्या कृत्याची माहिती कुटुंब, मित्र परिवार आणि पोलिसांना मिळाली होती. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता.

झारखंडमधील हजारीबाग येथील संदीप पासवान नावाच्या तरुणाने मुंबईत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. १७ सप्टेंबर रोजी ही घटना चेंबुरच्या एका फ्लॅटमध्ये घडली. झारखंडचा संदीप पासवान हा त्याच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. संदीपने आधी फेसबुक लाईव्ह केले आणि एक मुलगी आणि तिच्या कुटुंबावर फसवणूक आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला. त्यानंतर गळफास घेत संदीपने आपली जीवनयात्रा संपवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची सुरुवात २०१८ पासून झाली. व्यवसायाने अकाउंटंट असलेल्या संदीप पासवानचे मुंबईत राहणाऱ्या सपना पासवान नावाच्या तरुणीशी संबंध होते. हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढू लागली आणि ते एकमेकांना भेटू लागले. त्यानंतर २०२१ मध्ये सपनाने फ्लॅट खरेदी करायचा आहे असं सांगून संदीपकडून सुमारे १२.५ लाख रुपये घेतले. संदीपला संशय आल्याने त्याने पैसे परत मागितले. मात्र सुरुवातीला टाळाटाळ केल्यानंतर १४ जून २०२३ रोजी सपनाच्या कुटुंबीयांनी संदीपला मुंबईला बोलावून पैसे घेऊन येण्यास सांगितले. मात्र संदीप मुंबईला पोहोचताच त्याला मारहाण करण्यात आली आणि नेहरू नगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर कसेबसे संदीपने आपले बँक स्टेटमेंट आणि इतर कागदपत्रे सादर करत सपना आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध हजारीबाग न्यायालयात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. मात्र मुंबई पोलिसांनी तक्रार गांभीर्याने घेतली नाही आणि दिवाणी बाब म्हणून फेटाळून लावल्याचा आरोप संदीपने केला होता. यावेळी सपनाच्या कुटुंबियांकडून केस मागे घेण्याच्या आणि पैसे परत न करण्याच्या धमक्या येत राहिल्याचा आरोपही संदीपने केला. मित्रांनी समजावून सांगितल्यानंतर संदीपने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्याने मांसाहार सोडला, कामावर आणि देवाच्या भक्तीवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आणि मंदिरातही जाऊ लागला.

त्यानंतर मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास संदीपने चेंबूर येथील फ्लॅटमधून फेसबुक लाईव्ह सुरु केले. त्यात संदीपने अंगावर जखमेच्या खुणा आणि फाटलेला टी-शर्ट दाखवून सपनाच्या घरच्यांनी मारहाण करून मला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे सांगितले. संदीपने फेसबुक लाइव्हमध्ये म्हटलं की, तो मानसिक छळ आणि हिंसाचाराला कंटाळला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर संदीपच्या नातेवाईक आणि मित्रांनी पोलिसांना माहिती दिली. मात्र पोलीस संदीपच्या फ्लॅटवर पोहोचेपर्यंत संदीपने गळफास लावून आत्महत्या केली होती.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीस