सुलेखन विश्वातील ‘आदिशक्ती’
By Admin | Published: March 7, 2016 02:47 AM2016-03-07T02:47:05+5:302016-03-07T02:47:05+5:30
ज्वेलरी ग्राफिक, अॅब्सस्ट्रॅक्ट, स्क्रीबल.. असे सुलेखनाचे अनेक पैलू ‘आदिशक्ती-अक्षरशक्ती’ कला प्रदर्शनातून उलगडले आहेत
मुंबई : ज्वेलरी ग्राफिक, अॅब्सस्ट्रॅक्ट, स्क्रीबल.. असे सुलेखनाचे अनेक पैलू ‘आदिशक्ती-अक्षरशक्ती’ कला प्रदर्शनातून उलगडले आहेत. अच्युत पालव स्कूल आॅफ कॅलिग्राफी आयोजित या प्रदर्शनात महिला सुलेखनकारांनी वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती साकारल्या आहेत.
‘गेल्या दीड महिन्यापासून या कलाकारांनी प्रदर्शनासाठी धडपड केली आहे. केवळ फावल्या वेळेत सुलेखन शिकण्याच्या पुढे जाऊन त्यांनी या कलाकृती साकारल्या. त्या पाहून त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याची संकल्पना सुचली. गुरू म्हणून या कलाकारांकडून उत्तम काम करून घेणे हे माझे कर्तव्य आहे,’ असे पालव यांनी सांगितले.
या प्रदर्शनात अमृता गुरवने महिलांच्या केशरचनेतून प्रेरणा घेत कॅलिग्राफी केली आहे; तर सेजल शहा यांनी अक्षरांचा सेल्फी पॉइंट साकारला आहे.
या प्रदर्शनात सर्वांत लहान सुलेखनकार अदिती पाटीलने विविध रंगांच्या माध्यमातून सुलेखन केले आहे. या प्रदर्शनात विविध क्षेत्रांतील १२ ते ४० वर्षे वयोगटातील एकूण २० महिला सुलेखनकारांचा सहभाग आहे.
टेक्स्चरमध्ये स्क्रीबल कॅलिग्राफी श्रद्धा गोयल यांनी साकारली आहे. शलाका पत्की यांनी अॅब्स्ट्रक्ट कॅलिग्राफी रेखाटली आहे. मेघा यांनी केलेले अक्षरांचे झाडही रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे. कल्पना नागरकर यांनी मेहंदी आणि कॅलिग्राफीचा मेळ घातला आहे; तर प्राजक्ता म्हात्रे
यांनी फॅब्रिक कॅलिग्राफीच्या माध्यमातून कलाकृती साकारली आहे. (प्रतिनिधी)