Join us

नोकरीच्या बहाण्याने बोलवत, विद्यार्थ्याला लुबाडले; अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल

By गौरी टेंबकर | Published: March 30, 2024 6:08 PM

दोन दिवसानंतर त्याने घोडकेला फोन करत अंधेरी पूर्वच्या तेली गल्ली येथील रमेश मोरे चौक याठिकाणी भेटायला बोलवले. घोडके त्या ठिकाणी पोचल्यानंतर तो इसम त्याला भेटला.

मुंबई: नोकरीच्या बहाण्याने एका विद्यार्थ्याला भेटायला बोलवत त्याला लुबाडण्याचा प्रकार अंधेरी परिसरात घडला. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

तक्रारदार स्वराज घोडके (२१) हा भांडुप मध्ये आई बहीण आणि आजी सोबत राहत असून तो वाणिज्य शाखेच्या शेवटच्या वर्गात शिकत आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार त्याची या वर्षाच्या जानेवारी महिन्यात कॉलेजला जाताना बस मध्ये अनोखी व्यक्ती सोबत भेट झाली होती. त्यावेळी त्या व्यक्तीने घोडके ला नोकरी मिळवून देण्याचे सांगत स्वतःचा मोबाईल नंबर शेअर केला.

दोन दिवसानंतर त्याने घोडकेला फोन करत अंधेरी पूर्वच्या तेली गल्ली येथील रमेश मोरे चौक याठिकाणी भेटायला बोलवले. घोडके त्या ठिकाणी पोचल्यानंतर तो इसम त्याला भेटला. माझ्या मित्राने माझा फोन नेला असून मला एक अर्जंट कॉल करायचा आहे असे म्हणत  घोडकेचा मोबाईल हातात घेतला. त्यानंतर फोन करण्याच्या बहाण्याने तो आझाद रोडच्या दिशेने निघून गेला. बोडकेने त्याच्या मागोमाग जात त्याचा शोध घेतला पण तो सापडला नाही. तेव्हा आपली फसवणूक करण्यात आल्याचे त्याच्या लक्षात आले आणि त्याने अनोळखी व्यक्तीच्या विरोधात अंधेरी पोलिसात धाव घेतली.