जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ शैक्षणिक बंदची हाक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 05:55 AM2020-01-08T05:55:05+5:302020-01-08T05:55:26+5:30
जेएनयूमधील हल्ल्याचे पडसाद शैक्षणिक क्षेत्रामध्ये उमटत आहेत.
मुंबई : जेएनयूमधील हल्ल्याचे पडसाद शैक्षणिक क्षेत्रामध्ये उमटत आहेत. या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करीत बुक्टूने सर्व विद्यार्थी व शिक्षकांना ८ जानेवारी रोजी महाविद्यालयात काळ्या फिती लावून काम करण्याचे आवाहन केले आहे. तर स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय) या संस्थेने राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना याच दिवशी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सहभागी होण्याची हाक दिली आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी व शिक्षक, विषेशत: महिलांवर ५ जानेवारी रोजी सशस्त्र गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा बुक्टूने तीव्र निषेध केला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थी व शिक्षकांना ८ जानेवारी रोजी महाविद्यालयात काळ्या फिती लावून काम करून विरोध व्यक्त करावा, असे आवाहन बुक्टूने केले आहे.
तर जेएनयूमधील हल्ल्याच्या निषेधार्थ व शैक्षणिक मागण्यांसाठी राज्यभरात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक बंदमध्ये सामील व्हावे, असे आवाहन एसएफआयने केले आहे. जेएनयू विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि शिक्षणातील मागण्यांसाठी ८ जानेवारी रोजी संपूर्ण देशभर समविचारी संघटनांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. यात राज्यभरात सर्वत्र शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, शिक्षण संस्था व विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक बंदमध्ये सामील व्हावे, असे आवाहन एसएफआयच्या महाराष्ट्र राज्य कमिटीनेही केले आहे.
सर्वांना मोफत शिक्षणाच्या मागणीसाठी, उच्च शिक्षणावरील हल्ल्याच्या विरोधात व जेएनयू, जामिया तसेच इतर विद्यापीठांत विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात देशभरातील विद्यार्थी संघटनांनी ‘आॅल इंडिया नॅशनल फोरम टू सेव्ह पब्लिक एज्युकेशन’ असा मंच बनवला असून या फोरमने ८ जानेवारीच्या देशव्यापी शैक्षणिक संपाची हाक दिली आहे.
>आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी व्हा! शिक्षकांना आवाहन
ट्रेड युनियन संयुक्त समितीच्या आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनात सर्व शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बुक्टूमार्फत करण्यात आले आहे. छात्रभारतीसारख्या संघटनांनी कामगार संघटनांच्या या संपाला पाठिंबा म्हणून विद्यापीठ बंदची हाकही दिली आहे. तर संपाला पाठिंबा म्हणून शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे जनता शिक्षक महासंघ, मुंबई-कोकण विभागाचे अनिल बोरनारे यांनी स्पष्ट केले.