मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भांडुपमधून मनसेचे विभागप्रमुख संदीप जळगावकर यांचा पत्ता कापून शिरीष सावंत यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी पसरली आहे. ‘निरीक्षक म्हणून आले आणि तिकीट घेऊन गेले’, असा सूर कार्यकर्त्यांनी लावला. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लालाशेठ कंपाउंड येथे आलेल्या सावंतांसमोर कार्यकर्त्यांनी जळगावकरांचा जयघोष केला अन् सावंतांना तेथून काढता पाय घ्यावा लागला.
जळगावकर स्थापनेपासून मनसेत आहेत. गेल्या विधानसभेला त्यांना ४२ हजार मते मिळाली होती. मुंबईतील मनसे उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये त्यांच्या मतांची संख्या सर्वाधिक होती. त्यामुळे ते उमेदवारीबाबत आशावादी होते. तर शिरीष सावंत यांनी निरीक्षकाच्या भूमिकेतून उमेदवाराची चाचपणी केली होती; पण तेही येथून इच्छुक होते. दोन्ही इच्छुकांनी आपल्या कामाचा अहवाल पक्षाला दिला होता. त्यानंतर मंगळवारी रात्री शिरीष सावंत यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याने अनेक कार्यकर्त्यांना धक्का बसला.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मंगळवारी रात्री ११:३० च्या सुमारास सावंत यांनी लालाशेठ कंपाउंड येथे कार्यकर्त्यांच्या भेटीस आले असता कार्यकर्त्यांनी ‘संदीप जळगावकर आगे बढो, हम तुम्हारे साथ है’च्या घोषणा सुरू केल्या. कार्यकर्ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे लक्षात येताच सावंत तेथून निघून गेले.
एके काळी मनसेचा गड
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष लोकप्रियतेच्या शिखरावर असताना मराठीबहुल भाग असलेल्या भांडुपमधून मनसेचे तत्कालीन नेते शिशिर शिंदे यांनी ६८,३०२ मते मिळवीत काँग्रेस आघाडीचे शिवाजीराव नलावडे (३७,३५९) यांचा पराभव केला होता.
‘कृष्णकुंज’ ठाम
बुधवारी संदीप जळगावकर यांच्यासह दीडशे ते दोनशे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी ‘कृष्णकुंज’वर झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. यावेळी शर्मिला ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांच्यासमोरच उमेदवार बदलण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, एकदा निर्णय झाल्याने उमेदवार बदलता येणार नसल्याचे नांदगावकर यांनी सांगताच कार्यकर्ते माघारी आले. येत्या दोन दिवसांत भांडुपमधील मनसे पदाधिकारी वेगळी भूमिका घेऊ शकतात, असा सूत्रांचा अंदाज आहे.