मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क मैदानात पालिकेने खडी टाकल्याच्या निषेधार्थ मनसेच्यावतीने बुधवारी आंदोलन करण्यात आले. जॉगिंगसाठी आलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले, अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये रंगली होती. मनसेचे नेते नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करून पालिकेच्या कारभारावर टीका करण्यात आली.
शिवाजी पार्कमध्ये खडी टाकून रस्ता बनवला जात असल्याबद्दल स्थानिक रहिवासी, खेळाडू व मनसेकडून गेल्या काही दिवसांपासून विरोध केला जात आहे. शिवाजी पार्कमध्ये कोणताही रस्ता होणार नाही, असे स्पष्टीकरण महापालिकेने दिले. या खडीवर माती टाकण्यात येणार आहे. त्याखाली पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ग्रॅव्हल्स टाकण्यात येत असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे. मात्र या सुशोभिकरणाचे कामाला विरोधात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेकडून हे आंदोलन करण्यात आले.
तूर्तास काम थांबवले नागरिकाचा सुशोभिकरणाला विरोध नसून मैदानात कुठल्याही कारणास्तव खडी नको, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. तर हे काम करताना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे तूर्तास हे काम थांबवण्यात आले आहे. पालिका निवडणूक जवळ आल्याने यावर राजकारण केले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेना, मनसे यांच्यातील शीतयुध्द दिसून येत आहे.