Join us

भाडेकरू म्हणून आले; घरमालक समजू लागले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:07 AM

मुंबई : घरमालकाने आपल्या मालकीच्या घरात भाडेकरू ठेवल्यानंतर त्या भाडेकरूने बनावट कागदपत्रांच्या आधारे घर बळकावण्याच्या घटना अलीकडे वाढू लागल्या ...

मुंबई : घरमालकाने आपल्या मालकीच्या घरात भाडेकरू ठेवल्यानंतर त्या भाडेकरूने बनावट कागदपत्रांच्या आधारे घर बळकावण्याच्या घटना अलीकडे वाढू लागल्या आहेत. यामुळे घर मालकांना आपल्या लाखो-करोडोंच्या हक्काच्या घरासाठी न्यायालयात व पोलीस ठाण्यात धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे घरात भाडेकरू ठेवताना भाडेकरूबाबत कोणतीही माहिती न लपविता ती पोलिसांना देणे गरजेचे असते.

मुंबईत जवळपास २५ लाख भाडेकरू राहतात. हातावर पोट असलेल्या श्रमिकांच्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग भाड्याने राहतो. त्यात, धारावी, गोवंडी, चेंबूर, शिवाजीनगर, वांद्रेसारख्या परिसरात याचे प्रमाण अधिक आहे. अशात, घरमालकांनी नागरिकांना निवासी क्षेत्रामध्ये सदनिका, फ्लॅट, घर, दुकाने, हॉटेल, जागा इत्यादी भाडेतत्त्वावर देताना त्यांची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे. अनेकदा जास्तीचे भाडे मिळत असल्याने उच्चभ्रू वस्त्यांमध्येही भाडेकरूची माहिती लपविण्यात येते. याचा गैरफायदा घेत अनेक भाडेकरू घरमालकांकडून घर बळकावतात.

घर बळकावल्याच्या तक्रारी

बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांना पासपोर्ट तयार करून देणाऱ्या टोळीचा काही दिवसांपूर्वी पर्दाफाश झाला होता. छुप्या पद्धतीने राहात असलेल्या बांगलादेशींसह घुसखोरांची माहिती पोलिसांना नसल्याने ते बिनधास्तपणे मुंबईत वास्तव्य करीत असल्याचे वास्तव समोर आले होते. मुंबईत भाड्याने राहणाऱ्यांमध्ये परप्रांतीयांचे प्रमाण अधिक आहे. कामाच्या शोधात लाखोंच्या संख्येत कामगार वर्ग मुंबईत धाव घेताना दिसतो.

घर भाड्याने देताय..अशी घ्या काळजी...

आपल्या मालकीच्या घरात भाडेकरू ठेवताना भाडेकरूंच्या ओळखीबाबत त्याच्या मूळ वास्तव्याचा पुरावा किंवा ओळखपत्राचा पुरावा, परकीय नागरिकासंदर्भाने त्याच्या पासपोर्टची झेरॉक्स आणि व्हिजाची झेरॉक्स, भाडेकरू इसमांचे नजीकच्या काळातील छायाचित्र, भाडेकरूच्या मूळ वास्तव्याचा पत्ता, तेथील पोलीस ठाण्याचे नाव, नोकरीचे किंवा व्यवसायाचे ठिकाण अशी कागदपत्रे प्राप्त करून स्थानिक पोलीस ठाण्यात द्यावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

नोंदणी न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

भाडेकरूंची माहिती न देणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. मुंबईतही काही भाडेकरूंविरुद्ध ही कारवाई करण्यात येत आहे. यात, विशेषतः झोपडपट्टी भागातील रहिवासी मोठ्या प्रमाणात माहिती लपविताना दिसले आहेत. याप्रकरणी न्यायालयातदेखील अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत.

घरमालकांना आपल्या भाडेकरूची माहिती देणे गरजेचे आहे. सर्व घरमालकांनी भाडेकरूंची नोंदणी करून घेणे गरजेचे आहे. शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे. भाडेकरूंची नोंदणी न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

- चैतन्या एस., मुंबई पोलीस प्रवक्ते, मुंबई