लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सॉल्ट वॉटर क्रोकोडायल या प्रकारच्या मगरीच्या पिल्लाची विक्री करण्याचा प्रयत्न मंगळवारी वनविभागाने हाणून पाडला असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. अंधेरीच्या निवासी परिसरात एक इसम मगरीचे पिल्लू विकण्यास येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून ही मगर विक्री हाणून पाडण्यात आली.
या मगर विक्री करण्यासाठी आलेल्या अरबाज अन्सारी (२५) व विशाल धुरे (२९) यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून हे मगरीचे पिल्लूही ताब्यात घेण्यात आले. ठाण्याचे उपवनसंरक्षक संतोष सस्ते आणि सहायक वनरक्षक सोनल वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल (मुंबई) राकेश भोईर यांच्या नेतृत्वात त्यांच्या पथकाने एक बनावट ग्राहक ते पिल्लू खरेदी करण्यासाठी पाठवले. या दोघाही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १० ऑगस्टपर्यंत वनकोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
आरेतून आणली मगर?आम्ही आरोपींची चौकशी केली. तेव्हा त्यांनी ती मगरीचे पिल्लू गोरेगाव पूर्वच्या आरेमध्ये असलेल्या सत्तर फिट कुआ परिसरातून आणल्याचे आम्हाला सांगितले. ही मगर सॉल्ट वॉटर क्रोकोडायल म्हणून ओळखली जाते. त्यानुसार आम्ही त्यांच्या म्हणण्यातील तथ्य पडताळत आहोत.- राकेश भोईर, वनक्षेत्रपाल, मुंबई