- मनोहर कुंभेजकर
मुंबई : गेली 2 ते 3 दिवस संध्याकाळच्या वेळेस न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत बिबट्याच्या वावरामुळे येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. काल संध्याकाळी 7 च्या सुमारास इमारत क्रमांक 19 न्यू गार्डन हिल सोसायटीच्या कंपाउंड वॉल वरून मांजरीची शिकार करुन बिबट्या येथील लगत असलेल्या हिलटॉप म्हाडा बंगल्यात शिरला होता.
येथील बंगल्यात राहणाऱ्या एका गृहिणीने या बिबट्याला बघितले होते. येथील इमारत क्रमांक 19 न्यू गार्डन हिल सोसायटीचे सचिव युवराज गायकवाड यांनी लोकमतला ही माहिती दिली होती. 'लोकमत'मध्ये या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातमीची त्वरित दखल येथील स्थानिक आमदार आणि शिवसेनेचे प्रवक्ते सुनील प्रभू यांनी घेतली.
सदर बाब त्यांनी पर्यावरण मंत्री व उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे व वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे मांडली.तसेच बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा आणि येथे पिंजरा लावण्यात यावा आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी येथे गस्त घालावी अशी मागणी त्यांनी केली.काल मध्यरात्री 12 नंतर तसेच आज दुपारी 3.30 च्या सुमारास वनखात्याची टीम येथे आली.
आज येथे बिबट्याचा शोध घेण्यासाठी इमारत क्रमांक 19 आणि हिलटॉप सोसायटीच्या मागील बाजूस स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने वनखात्याच्या टीमने कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे बिबट्याचा ठावठिकाणा समजेल आणि बिबट्याला ट्रॅप मध्ये पकडणे शक्य होईल अशी माहिती वनक्षेत्रपाल ( तुळशी ) दिनेश देसले यांनी लोकमतला दिली.
'लोकमत'चे मानले आभार'लोकमत'ने येथील बिबट्याच्या वावराची दखल घेऊन सदर वृत्त प्रसिद्ध केल्याने यावर त्वरित कारवाई झाली.आज कॅमेरे लावल्याने बिबट्याचा ठावठिकाणा लवकर समजेल अशा विश्वास युवराज गायकवाड यांनी व्यक्त केला.