Join us

रेल्वे टीसीच्या कोटवर कॅमेरे, आता टीसीशी हुज्जत घालणे पडणार महागात! पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2023 4:46 PM

मुंबईतील लोकल मार्गावर विनातिकीट प्रवाशांची वाढती संख्या आणि प्रवाशांचे टीसीसोबत होणारे वाद लक्षात घेता मध्य रेल्वेनं टीसीच्या गणवेशावर बॉडी कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई- 

मुंबईतील लोकल मार्गावर विनातिकीट प्रवाशांची वाढती संख्या आणि प्रवाशांचे टीसीसोबत होणारे वाद लक्षात घेता मध्य रेल्वेनं टीसीच्या गणवेशावर बॉडी कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे. टीसीच्या कोटाच्या खिशाजवळ हे कॅमेरे लावण्यात येणार आहेत. या कॅमेरामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगसह ऑडिओ देखील रेकॉर्ड होणार आहे. तसंच हे रेकॉर्डिंग महिनाभर जतन करुन ठेवता येणार आहे. त्यामुळे प्रवासी आणि टीसी यांच्यात होणारे वाद रेकॉर्ड होतील. 

लोकल, मेल-एक्स्प्रेसने प्रवास करताना अनेकदा प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. सेकंड क्लासच्या पासवर फर्स्ट क्लास, एसी लोकलमध्ये चढतात. अशा प्रवाशांवर टीसीद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येते. परंतु अनेकदा या कारवाईदरम्यान प्रवासी टीसीसोबत वाद घालतात. काहीवेळा वादाचं रुपांतर हाणामारीतचं झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेनं टीसीच्या सुरक्षेसाठी बॉडी कॅमेराचा पर्याय शोधून काढला आहे. 

टीसींच्या सुरक्षेसोबतच प्रवाशांचाही काही टीसींबाबतच्या तक्रारी असतील तर त्या सोडवण्यासाठीही या कॅमेरांचा वापर होणार आहे. प्रवाशांच्या टीसीबाबत काही तक्रारी असल्यास वरिष्ठ अधिकारी त्या व्हिडिओद्वारे चौकशी करू शकणार आहेत.