मुंबई : पश्चिम विभागीय तटरक्षक दलाच्यावतीने मुंबईत सोमवारपासून सागरी शोध आणि बचाव समन्वयाबाबत सात दिवसीय आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर सुरू झाले आहे. या शिबिराचे उद्घाटन तटरक्षक दलाचे महानिरीक्षक भीष्म शर्मा यांनी केले. यावेळी समुद्रातील नाविकांच्या सुरक्षेसाठी निरंतर सहयोग आणि समन्वयाची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली, तसेच परस्परांचे ज्ञान आणि कौशल्ये गरजेनुसार वापरता यावीत, यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.
दरवर्षी तटरक्षक दलाच्या प्रादेशिक मुख्यालयाच्या मुंबईतील सागरी बचाव समन्वय केंद्राच्या वतीने आयएटीसी, एमईए यांच्या सहयोगाने हे प्रशिक्षण शिबिर घेण्यात येते. यामध्ये सागरी शोध आणि बचाव नियोजन व समन्वय, डेटा संकलन व मापन, उपग्रहाद्वारे ऑपरेशन्स आणि केस स्टडी याबाबत मार्गदर्शन केले जाते. सर्वप्रथम २०२१ मध्ये झालेल्या या शिबिरात ४ देशांतील १५ जण सहभागी झाले होते. यावर्षी बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, सेशेल्स आणि श्रीलंका अशा ६ देशांतील २२ प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
२१ मच्छीमारांना वाचवले
सागरी शोध आणि बचावासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या सागरी बचाव समन्वय केंद्राला वर्षभरात २१०० हून अधिक अलर्ट प्राप्त झाले होते. त्या सर्वांना सुरक्षेसाठी योग्य प्रतिसाद देण्यात केंद्राला यश आले. गेल्या काही महिन्यांत त्यांनी भारतीय क्षेत्राच्या बाहेरही ऑपरेशन्स राबवली असून, अशा दोन मोहिमांमध्ये पाकिस्तानच्या बुडालेल्या बोटींवरील एकूण २१ भारतीय मच्छीमारांना वाचवण्यात आल्याची माहिती तटरक्षक दलाने दिली.