Join us  

कॅम्पाकोलावासियांना मुख्यमंत्र्यांकडूनही दिलासा नाहीच

By admin | Published: June 22, 2014 4:21 PM

कॅम्पाकोलाच्या रहिवाशांनी आधी महापालिकेला कारवाई करु द्यावी. त्यानंतर कायदेशीर तोडगा काढण्यावर चर्चा करु असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॅम्पाकोलावासियांना दिले आहे.

 

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २२ -  कॅम्पाकोलाविषयी कायदेशीर तोडगा काढण्यासाठी महापालिका व कायदेतज्ज्ञांशी चर्चा करु असे आश्वासन देतानाच रहिवाशांनी आधी महापालिकेला कारवाई करु द्यावी असे सांगत  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॅम्पाकोलावासियांना  दिलासा दिलेला नाही.
रविवारी सकाळी मुंबई महापालिकेचे पथक वीज, पाणी व गॅस कनेक्शन तोडण्यासाठी कॅम्पा कोलात दाखल झाले. रहिवाशांनी सलग तिस-या दिवशी महापालिका पथकाला प्रवेशद्वारावरच रोखून ठेवले. रविवारी महापालिकेचे पथक अतिरिक्त पोलिस दलासोबत आल्याने महापालिकेकडून पोलिस बळाचा वापर होण्याची शक्यता होती. महापालिका अधिका-यांनीही अर्धा तासात निर्णय घ्यावा. पोलिस बळाचा वापर करण्यास भाग पाडू नये अशी तंबीच रहिवाशांना दिली होती. 
मात्र या दरम्यान आ. बाळा नांदगावकर यांनी कॅम्पा कोलाप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वेळ मिळवली. दुपारी अडीचच्या सुमारास बाळा नांदगावकर, भाजपच्या शायना एन सी, कॅम्पा कोलातील रहिवासी डॉ. अजय मेहता व अन्य सात जणांच्या शिष्टमंडळाने वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्याची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी रहिवाशांनी महापालिकेला कारवाई करु द्यावी अन्यथा ते सुप्रीम कोर्टाची अवमानना होईल असे निदर्शनास आणून दिले. या कारवाईनंतर कायदेशीर बाबींवर महापालिका अधिका-यांशी चर्चा करु असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. आता महापालिकेचे पथक कारवाई कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.