वीजचोरीविरुद्ध मोहीम : ११६ प्रकरणांत पकडली २४ लाखांची वीजचोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:06 AM2021-01-18T04:06:42+5:302021-01-18T04:06:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महावितरणच्या भांडूप परिमंडलात वीजचोरीवर आळा घालण्यासाठी नोव्हेंबरपासून मोहीम राबविण्यात येत असून, गेल्या दोन महिन्यांत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महावितरणच्या भांडूप परिमंडलात वीजचोरीवर आळा घालण्यासाठी नोव्हेंबरपासून मोहीम राबविण्यात येत असून, गेल्या दोन महिन्यांत भांडूप परिमंडलात ११६ प्रकरणांत तब्बल २४ लाखांची वीजचोरी उघडकीस आणली आहे.
महावितरणच्या नेरूळ विभागातील नेरूळ, पाम बीच, सीबीडी बेलापूर उपविभागात वीजचोरांवर कारवाई करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली. या ठिकाणी वीजजोडणी तपासल्यावर ११६ वीजचोरीचे प्रकरण समोर आले. ज्यामध्ये २३ प्रकरणात २.५३ लाखाची वीजचोरी पकडण्यात आली. ९३ प्रकरणात १६५२२८ युनिटची २१.४८ लाखांची वीजचोरी पकडण्यात आली असून एकूण २४ लाखांची वीजचोरी उघडकीस आली आहे.
मीटरमध्ये फेरफार करणे, मीटरमध्ये रेझिस्टन्स टाकणे, चेंज ओव्हर स्वीचचा वापर करून मीटर बायपास करणे, सर्व्हिस वायरला टॅप करून वीजचोरी करणे अशा प्रकारची विविध प्रकरणे उघडकीस आली आहेत. तरी ग्राहकांनी आमिषाला न बळी पडता प्रामाणिकपणे विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
वीजचोरांविरुद्ध मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. वीजचोरांमुळे प्रामाणिकपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना त्रास होतोच तर कंपनीचे आर्थिक नुकसान ही होते. त्यामुळे वीजचोरी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची ताकीद देण्यात आली आहे. मुदतीत वीजबिलसह दंडाची रकम भरली नाही तर वीजचोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असे महावितरणने सांगितले.