मुंबई : स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कलाकेंद्राच्या ‘कलाश्रम’ उपक्रमाअंतर्गत दिला जाणारा ‘अभियान सन्मान’ पुरस्कार, ज्येष्ठ पत्रकार राज चिंचणकर यांना जाहीर झाला. चित्रपट व नाट्यसमीक्षा तसेच सांस्कृतिक कार्यासाठी असलेल्या या पुरस्काराच्या अंतर्गत, ज्येष्ठ दिवंगत पत्रकार व चित्रपट अभ्यासक दिवाकर गंधे यांच्या नावे त्यांना ‘दखलपत्र’ प्रदान केले जाणार आहे.
‘अभियान सन्मान’ हा ‘कलाश्रम’चा सांस्कृतिक उपक्रम आहे. ज्येष्ठ पत्रकार व चित्रपट अभ्यासक दिवाकर गंधे, ‘हसरी उठाठेव’ या एकपात्री कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद चांदेकर, लोकगीत-लावणी गायिका शोभा राणे-गायकवाड व ज्येष्ठ रंगकर्मी मुकुंद कोठारे यांच्या मार्च महिन्यातील स्मृतिदिनांचे औचित्य साधून हे पुरस्कार दिले जातील. त्यासाठी अनुक्रमे पत्रकार राज चिंचणकर, मिमिक्री कलावंत राहुलकुमार, लोकगायिका संचिता मोरजकर व अभिनेते प्रमोद सुर्वे यांची निवड करण्यात आली आहे.
ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक नागेश भोसले यांच्या हस्ते या मान्यवरांना ‘दखलपत्रे’ प्रदान करण्यात येतील. मंगळवार, ३० मार्च रोजी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतील हिंदुस्थानी सभागृहात हा सोहळा होईल. या वेळी अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते शाहीर दादा कोंडके यांच्या मार्च महिन्यातील स्मृतिदिनाच्या निमित्ताने, प्रमोद नलावडे त्यांना साभिनय आदरांजली वाहतील.
-----------------------------------------------------------------------------------------