संभाजी ब्रिगेडच्या निषेधासाठी मोहीम
By Admin | Published: February 2, 2017 03:07 AM2017-02-02T03:07:32+5:302017-02-02T03:07:32+5:30
डोंबिवलीसारख्या साहित्यनगरीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संभाजी ब्रिगेडचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याच्या वृत्तीचा निषेध
डोंबिवली : डोंबिवलीसारख्या साहित्यनगरीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संभाजी ब्रिगेडचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याच्या वृत्तीचा निषेध करावा, यासाठी मोहीम उघडण्यात आली आहे.
ज्येष्ठ साहित्यिक राम गणेश गडकरी यांचा पुण्याच्या संभाजी उद्यानातील पुतळा संभाजी ब्रिगेडने फोडल्याच्या घटनेचा निषेध साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी स्पष्टपणे करण्यात यावा, अशी ही मागणी आहे.
ज्या साहित्यप्रेमींना ही घटना अप्रिय वाटते, त्यांनी त्यांचा निषेध नोंदवावा, असे सुचवत हा निषेध व्यक्त करून साहित्य महामंडळावर दबाव आणण्यासाठी लिंक तयार करण्यात आली आहे. त्यासाठी एका शिक्षणसंस्थेत पदाधिकारी असलेले, वाचक आणि साहित्य रसिक आशीर्वाद बोंद्रे यांनी वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आवाहन केले आहे. पुढील दोन दिवसांत या लिंकवर त्याचा निषेध व्यक्त करून ती अनेक साहित्यिक व साहित्यप्रेमींसह जाणकारांना पाठवावी, असे त्यांनी सुचवले आहे.
साहित्यात अभिजन आणि बहुजन असे वाद आहेत. बहुजन साहित्याचे पुरस्कर्ते असल्याचे संभाजी ब्रिगेड मानते. अभिजन साहित्यातील पूर्वीचे संदर्भ आताच्या काळात खोडून काढण्यासाठी त्यांच्याकडून गडकरी यांचा पुतळा फोडण्याचा प्रकार घडला. या घटनेवर पुरोगामी विचारसरणी मानणारे आणि विद्रोही साहित्यिकांनी अजूनही परखड मत व्यक्त केलेले नाही किंवा स्पष्ट निषेदाची भूमिकाही घेतलेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या १२५ व्या जयंती दिनानिमित्त साहित्य संमेलनातही संभाजी ब्रिगेडने असाच गोंंधळ घालून अध्यक्षा डॉ. प्रज्ञा लोखंडे आणि विचारवंत रावसाहेब कसबे यांना संमेलनस्थळ सोडून जाण्यास भाग पाडले होते. त्यांच्या भाषणावेळी व्यत्यय आणला होता. मात्र, त्यावरही साहित्यिकांनी भूमिका घेतली नाही.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्यांविरोधात साहित्यिकांनी रस्त्यावर उतरून विरोध केला पाहिजे, असे आवाहन नुकतेच डोंबिवलीतील कार्यक्रमात करण्यात आले, पण तेव्हाही या मुद्द्यांचा थेट समावेश न करता सरकारच्या आधीच्याच नियमांचा दाखला देण्यात आला होता.
डोंबिवलीतील अखिल भारतीय साहित्य संमेलनाची कार्यक्रमपत्रिका ठरवताना साहित्य महामंडळाने स्त्रिया, तरुुण, बालसाहित्य, नवोदित लेखक, मनोरंजनाचे कार्यक्रम अशा सर्वांना स्थान दिले, असले तरी मराठी आरक्षण, अखंड महाराष्ट्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अशा- ज्यावर भूमिका घ्यावी लागेल, अशा विषयावर एकही परिसंवाद ठेवलेला नाही. फक्त पुरोगामी महाराष्ट्र आणि असहिष्णुतेचा मुद्दा असा मोघम उल्लेख करून एक परिसंवाद ठेवला आहे. (प्रतिनिधी)
अध्यक्षांची भूमिका काय?
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने डॉ. अक्षयकुमार काळे यांनी या विषयावर अद्याप कोणतीही रोखठोक भूमिका घेतलेली नाही. त्यांच्या अध्यक्षीय भाषणावर महामंडळ किंवा आयोजकांचे कोणतेही नियंत्रण नसेल. त्यांना विचार मांडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे काळे या विषयाला त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून स्पर्श करणार की नाही, याविषयी उत्सुकता आहे.
- साहित्य संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात कोणते ठराव मांडले जातील, यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नसल्याचे आयोजक सांगत आहेत. त्यामुळेच राम गणेश गडकरी यांचा पुतळा फोडल्याबद्दल संभाजी ब्रिगेडचा स्पष्ट निषेध करणारा ठराव मांडला जावा, अशी अपेक्षा व्यक्त करणारी मोहीम सुरू झाली आहे.