मोहीम थंडावताच अतिक्रमणे पुन्हा तेजीत
By admin | Published: June 30, 2015 11:51 PM2015-06-30T23:51:07+5:302015-06-30T23:51:07+5:30
सिडकोची अतिक्रमण विरोधी मोहीम थंडावताच भूमाफियांनी पुन्हा तोंड वर काढले आहे. कारवाईच्या भीतीने मागील महिनाभरापासून बंद पडलेली अनधिकृत
नवी मुंबई : सिडकोची अतिक्रमण विरोधी मोहीम थंडावताच भूमाफियांनी पुन्हा तोंड वर काढले आहे. कारवाईच्या भीतीने मागील महिनाभरापासून बंद पडलेली अनधिकृत बांधकामे पुन्हा तेजीत सुरू झाली आहेत. गाव-गावठाणांसह शहरी भागात अर्धवट अवस्थेतील इमारतींचे बांधकाम पूर्ण करण्याच्या कामाचा धडाका सुरू झाला आहे. याची गंभीर दखल घेत अशा बांधकामांची यादी तयार करण्याच्या सूचना सिडकोने संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे येत्या
काळात सिडकोची अतिक्रमण
विरोधी मोहीम अधिक तीव्र
होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सिडकोने गाव - गावठाणात २0१२ नंतर उभारण्यात आलेल्या बांधकामांवर कारवाईचा धडाका लावला आहे. या कारवाईचे तीव्र पडसाद प्रकल्पग्रस्तांत उमटले. त्याचा परिणाम म्हणून कारवाईला ठिकठिकाणी प्रखर विरोध करण्यात आला.
त्यानिमित्ताने प्रथमच सर्वपक्षीय नेते एकत्रित आले. त्यानंतरही सिडकोने कारवाई सुरूच ठेवल्याने हवालदिल झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी हजारोंच्या संख्येने सिडकोवर धडक दिली. त्यामुळे कारवाईची मोहीम काहीशी थंडावली. याचा फायदा घेत भूमाफियांनी पुन्हा बांधकामांचा धडाका लावला आहे.
अर्धवट राहिलेली इमारत पूर्ण करण्यासाठी आटापिटा सुरू आहे. विशेषत: नेरूळ, सानपाडा, जुहूगाव, कोपरीगाव, कोपरखैरणे, घणसोली, गोठीवली, ऐरोली व दिघा आदी भागात आजही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. याची गंभीर दखल सिडकोने घेतली आहे. (प्रतिनिधी)
लवकरच पाठवणार नोटिसा
महापालिका आणि सिडको क्षेत्रात डिसेंबर २0१२नंतर उभारण्यात आलेल्या २,४४८ बांधकामांना सिडकोने यापूर्वीच नोटिसा बजावल्या होत्या. त्यापैकी सुमारे पावणे दोनशे बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. त्याचा अहवाल सिडकोने न्यायालयात सादर केला आहे.
उर्वरित २,२५0 बांधकामे अतिक्रमण विभागाच्या रडारवर आहेत. मागील बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांबरोबर झालेल्या चर्चेनुसार या उर्वरित बांधकामांना नव्याने नोटिसा पाठविण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. नोटिसा पाठविण्याची ही प्रक्रिया येत्या शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार असल्याचे सिडकोच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख योगेश म्हसे यांनी सांगितले.