मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आरोप-प्रत्यारोपाने वातावरण तापले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. तिसऱ्या टप्प्यात देशभरातील 16 राज्यातील 118 लोकसभा मतदार संघातील जागांसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 14 जागांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील आजच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राहुल गांधी, शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रचाराच्या सभा घेतल्या. या निवडणुकीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, भाजपाचेमहाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले, स्वाभिमानीचे राजू शेट्टी, समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंह यादव, भाजपाचे वरुण गांधी, भाजपा नेत्या जयाप्रदा आदींचे भवितव्य 23 एप्रिल रोजी मतपेटीत बंद होणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या 14 मतदार संघात 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर, बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, कर्नाटक, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, गुजरात, केरळ, दादर-नगर हवेली, दमण व दीव, गोवा, तामिळनाडू, त्रिपूरा आणि जम्मू राज्यांतील काही मतदारसंघामध्ये 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.