मुंबई: मुसळधार पावसामुळे मलबार हिल परिसरातील टेकडीचे भूस्खलन होऊन रस्त्याला तडे गेल्यामुळे दोन महिने बंद असलेला केम्प्स कॉर्नर उड्डाणपूल अखेर १५ ऑक्टोबरपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. भूस्खलन झालेल्या भागाची पुनर्बांधणी केल्यानंतर सदर रस्ता, पूल व तेथे सुरु असलेल्या कामांची संयुक्त पाहणी पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी केली. त्यांनतर या उड्डाणपुलावरील वाहतुकीचा मार्ग गुरुवारपासून मोकळा करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले.
दक्षिण मुंबईत ६ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे हँगिंग गार्डन नजिक बी.जी. खेर मार्गावरील संरक्षण भिंत कोसळली. यामुळे १५ झाडं मुळासकट उपटून रस्त्यावर दरड कोसळली होती. तसेच रस्ता खालील जलवाहिनीचे नुकसान होऊन रस्त्याला तडे गेले होते. दरड कोसळण्याच्या क्षेत्राची संयुक्त पाहणी केल्यानंतर पुन्हा अशा दुर्घटनेची शक्यता असल्याने केम्स कॉर्नर उड्डाणपुलाला जोडणारा एन.एस. पाटकरचा भाग एक महिना बंद ठेवण्यात आला होता. या परिसराचा अभ्यास करण्यासाठी आयआयटी, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक तज्ज्ञ समिती देखील नेमण्यात आली.
या सल्लागार समितीमध्ये ख्यातनाम संरचनात्मक सल्लागारांसह भूगर्भशास्त्र तज्ज्ञांचाही समावेश आहे. या कामासाठी महापालिकेने एका तज्ज्ञ सल्लागार संस्थेचीही नेमणूक केली आहे. तांत्रिक तज्ज्ञ समितीने व तांत्रिक सल्लागार यांनी सादर केलेली संकल्प चित्रे व निविदा सूचना प्रकाशित झालेल्या आहेत. डिसेंबर २०२० मध्ये ‘मलबार हिल’ परिसरातील सदर टेकडीची पुनर्बांधणी व न्यायमूर्ती सीताराम पाटकर रस्त्याच्या पुनर्बांधणीचे कामे सुरु होणार आहे.