Join us

भिंती पाडून दोन फ्लॅट मी एकत्र करू शकतो? जाणून घ्या नियम काय सांगतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 6:00 AM

सदनिकेत अंतर्गत बदल करताना भिंती पाडायच्या असतील तर महापालिकेची परवानगी आवश्यक आहे का?

सदनिकेत अंतर्गत बदल करताना भिंती पाडायच्या असतील तर महापालिकेची परवानगी आवश्यक आहे का? असे बदल करताना इतर सदनिकाधारकांचे काय अधिकार आहेत?, महापालिकेशिवाय  आणखी कोणाकडे तक्रार केली जाऊ शकते?, सोसायटीला काय अधिकार आहेत?- एक वाचकआपण सदनिका घेतल्यावर अनेकदा त्यात अंतर्गत बदल करण्याची गरज भासायला लागते. एकाला एक लागून दोन सदनिका असतील तर कधी मधल्या भिंती काढून टाकाव्यात असे वाटते. अशावेळी नेमके काय करायचे हे माहिती असणे आवश्यक आहे. मुळात सदनिकाधारकाला तिचा वापर करतांना मूळ इमारतीला किंवा इतर सदनिकाधारकांच्या जागांना कोणताही धोका निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते. इमारतीच्या मूळ आराखड्याला धक्का लागेल असे म्हणजे आरसीसीचे पिलर्स आणि बीम  तसेच स्लॅबची तोडफोड करण्याचा अधिकार सदनिकाधारकाला नसतो. यासाठी आपण जे बदल करणार आहोत त्याने इमारतीची सुरक्षितता धोक्यात येणार नाही असे एखाद्या मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल सल्लागाराचे प्रमाणपत्र आपण मिळवले तर हा विषय सोपा होऊ शकतो. याशिवाय आपल्याला आपली सोसायटी किंवा अपार्टमेंट असल्यास त्याचे व्यवस्था मंडळ यांची परवानगीदेखील मिळवणे आवश्यक आहे.

आपण करीत असलेल्या तोडफोडीचा आवाज किंवा त्यातून निर्माण होणारा राडारोडा इतरांना त्रासदायक होणार नाही याची आपल्याला खबरदारी घ्यावी लागते. योग्य अटींच्या अधीन राहून सोसायटी आपल्याला असे बदल करायला परवानगी देऊ शकते. खरे पाहता एकदा महापालिकेच्या नगररचना विभागाने मान्यता दिलेल्या इमारतीच्या आराखड्यात कोणताही बदल करायचा असल्यास त्या विभागाची पूर्वसंमती मिळवणे आवश्यक असते. 

सदनिकेत बदल करण्याला परवानगी देण्याचा अधिकार सोसायटी / अपार्टमेंटच्या व्यवस्थापन समितीला आहे याचा अर्थ आपले रास्त आणि किरकोळ स्वरुपाचे प्रस्ताव अडवण्याचा परवाना त्या समितीला मिळाला आहे असेही नाही. अशा विषयात समन्वयाने विचार केला जाणे आवश्यक असते. 

- दिलीप फडके, ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते  तुमचे प्रश्न / अडचणी पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता : tarkaikaral@gmail.com